अमळनेरात ‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’ प्रदर्शनाचे दिमाखात उद्घाटन शासनाच्या योजना, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अमळनेर प्रतिनिधी : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, विकासात्मक उपक्रम आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अमळनेर येथील कलागुरू मंगल भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’ या भव्य प्रदर्शनास बुधवार, दि. ७ ऑक्टोबरपासून उत्साहात सुरुवात झाली.
प्रदर्शनातील महावितरणच्या दालनाचे उद्घाटन वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार नंदकुमार महाजन, आमदार अमोल जावळे, खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल, मुनिशन्स इंडिया लिमिटेडचे चीफ जनरल मॅनेजर एम. झेड. सर वर, यंत्रा इंडियाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर निरंजन लाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार स्मिता उदय वाघ यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात केंद्र व राज्य शासनाच्या ७० हून अधिक योजनांची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कृषी व फलोत्पादन, विज्ञान-तंत्रज्ञान, संरक्षण तंत्रज्ञान, वित्त, बँकिंग व विमा, आरोग्य, ऊर्जा व पर्यावरण, शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान, वाहतूक, रेल्वे, पर्यटन, हस्तकला व हातमाग आदी विविध क्षेत्रांतील योजना व उपक्रमांची माहिती प्रदर्शनातून दिली जात आहे.
महावितरणच्या दालनात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.०, मागेल त्याला सौर कृषिपंप योजना, रूफटॉप सोलर योजना तसेच स्मार्ट मीटरचे फायदे याबाबत माहिती देण्यात येत आहे. नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र नोंदवहीची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक, उद्योजक तसेच सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रत्यक्ष संबंधित विभागांकडून जाणून घेण्याची संधी मिळत आहे. विविध विभागांचे अधिकारी व तज्ज्ञ प्रदर्शनस्थळी मार्गदर्शनासाठी उपस्थित आहेत.
७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान सुरू असलेल्या या प्रदर्शनाला अमळनेर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती घ्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. दत्ता थोरे यांनी प्रास्ताविक, संजय पाटील यांनी सूत्रसंचालन तर संदीप पाटील यांनी आभार मानले.
