परिश्रम दिव्यांग विद्यालयातील ५१ विद्यार्थ्यांना लायन्स क्लबतर्फे गणवेश व भोजन
अमळनेर प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी जपत लायन्स क्लब ऑफ अमळनेरच्या वतीने परिश्रम दिव्यांग बॉईज अँड गर्ल्स स्कूल, पारोळा रोड, अमळनेर येथे ६ ऑक्टोबर रोजी शालेय गणवेश वाटप व भोजनाचा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत विद्यालयातील ५१ दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्यात आला तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण व समाधानकारक वातावरणात पार पडला.
यावेळी लायन्स क्लब ऑफ अमळनेरचे सर्व सदस्य उपस्थित होते. क्लबच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढविला. गरजू व दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
लायन्स क्लबच्या या सामाजिक उपक्रमाचे विद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांसह उपस्थितांनी कौतुक केले.
