२६ जणांचे रक्तदान, ७१ जणांची रक्तशर्करा तपासणी; लायन्स क्लबच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
अमळनेर प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी जपत लायन्स क्लब ऑफ अमळनेरच्या वतीने मंगळग्रह मंदिर येथे ६ ऑक्टोबर रोजी रक्तदान व रक्तशर्करा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९.३० वाजता झालेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरात २६ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व निभावले. तसेच ७१ नागरिकांची रक्तशर्करा तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान दोन व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक आढळून आले. त्यांना पुढील वैद्यकीय तपासणी करून तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमातून रक्तदानाचे महत्त्व तसेच नियमित रक्तशर्करा तपासणीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. लायन्स क्लब ऑफ अमळनेरचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. त्यांच्या सहकार्याने शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
लायन्स क्लबच्या या आरोग्यविषयक सामाजिक उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.
