ब्रेकिंग
अमळनेरच्या नगाव बुद्रुकमध्ये स्वस्त धान्य दुकानदाराचा काळाबाजार? लाभार्थ्यांचे अंगठे घेऊन धान्यच गायब, सरपंचांनी थेट उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली तक्रार

 

अमळनेर (जळगाव) – तालुक्यातील नगाव बुद्रुक येथील स्वस्त धान्य दुकानाबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. गावातील रेशन दुकान क्रमांक *FPS क्र. 149911400312* चे दुकानदार शासनाचे धान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवतच नसल्याचा धक्कादायक आरोप ग्रामस्थानी केला आहे. याबाबत ग्रामस्थ नगाव बु। च्या वतीने उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

*काय आहे तक्रारीत?*

सरपंच सौ. सरिताबाई पद्माकर गोसावी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

> मौजे नगाव बु।। येथील रेशन दुकान क्र. FPS 149911400312 यांचे बाबतीत गावात मोठ्या प्रमाणात तक्रारी असून त्यांनी अनेक लाभार्थ्यांकडून अंगठे घेऊन कोणालाही रेशन वितरीत केलेले नाही. सदर बाब अत्यंत गंभीर असून याबाबत तात्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, सोबत लाभार्थ्यांच्या तक्रारींचे अर्ज जोडले आहेत.

गावातील अनेक कुटुंबांनी सरपंचांकडे तक्रार केली होती की, दुकानात गेल्यावर मशीनवर अंगठा घेतला जातो, पण धान्य दिले जात नाही. “सिस्टममध्ये नंतर दाखवतो” असे सांगून लाभार्थ्यांना परत पाठवले जाते. कित्येक महिन्यांपासून अनेकांचे रेशन कार्ड देखील बंद असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

*ग्रामपंचायतीची मागणी*

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्रामपंचायतीने तातडीने दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित स्वस्त धान्य दुकानदारावर कडक कारवाई करावी आणि गोरगरीब लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य त्वरित मिळवून द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या निवेदनाच्या प्रती पुरवठा अधिकारी, अमळनेर आणि तहसीलदार, अमळनेर यांना देखील देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या तक्रारीमुळे अमळनेर तालुक्यातील स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण नगाव बुद्रुक गावाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *