चित्रकला परीक्षांच्या काळात क्रीडा स्पर्धा नको जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाची जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांकडे मागणी
अमळनेर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य कला संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा २०२६ मधील एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा दि. २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणार आहेत. या कालावधीत जिल्ह्यात क्रीडा स्पर्धांचे आयोजन करू नये, अशी मागणी जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाने जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेला जिल्ह्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होत असतात. त्याच कालावधीत क्रीडा स्पर्धांचे आयोजन झाल्यास विद्यार्थ्यांना चित्रकला परीक्षा किंवा क्रीडा स्पर्धा यापैकी कोणत्यातरी एका उपक्रमाची निवड करावी लागू शकते. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे संघाने पत्रात नमूद केले आहे.
विद्यार्थ्यांना कला आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांत सहभागी होण्याची समान संधी मिळावी तसेच कोणत्याही विद्यार्थ्यावर एका उपक्रमापासून दूर राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी दि. २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत क्रीडा स्पर्धा घेणे टाळावे, अशी विनंती संघाने केली आहे.
शासकीय चित्रकला परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक एकमेकांशी संघर्ष होणार नाही, याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाच्या अध्यक्षांनी जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना यासंदर्भातील निवेदन दिले आहे.
