धनदाई महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा
अमळनेर : धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय, अमळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. लीलाधर पाटील, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. जयवंतराव पाटील, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. मीनाक्षी इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. मीनाक्षी इंगोले यांनी केले. २४ सप्टेंबर हा राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस असून देशभरात हा दिवस साजरा केला जातो, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. लीलाधर पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या वाटचालीचा आढावा घेतला. महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, सामाजिक भान आणि लोकशाही मूल्यांची जडणघडण करणे हा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘नॉट मी बट यू’ या भावनेतून प्रत्यक्ष समाजसेवेच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य सुरू असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजना हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. मीनाक्षी इंगोले यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
