सेवाभाव, श्रमदान अन् सामाजिक बांधिलकीचा जागर; चोपड्यात NSS स्थापना दिन साजरा
चोपडा प्रतिनिधी : भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्थापना दिनानिमित्त विविध उपक्रमांसह विशेष व्याख्यानाचे आयोजन दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात करण्यात आले. यावेळी ‘NOT ME, BUT YOU’ या NSSच्या ब्रीदवाक्याचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी NSS गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. संबोधी देशपांडे यांनी केले, तर विद्यार्थिनी दिव्या कोळी हिने सूत्रसंचालन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर आणि उपप्राचार्य प्रा. डॉ. आशिष गुजराथी यांनी विद्यार्थ्यांना NSS स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा येथील प्रा. डॉ. प्रकाश लभाणे यांनी ‘राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये युवकांची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे ‘NOT ME, BUT YOU’ हे ब्रीदवाक्य विद्यार्थ्यांनी आचरणात आणण्याचे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवकांमध्ये सेवाभाव, सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि व्यक्तिमत्त्व विकास घडतो, असे सांगताना डॉ. लभाणे यांनी NSSच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांवर प्रकाश टाकला. सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून श्रमदान, परिसर स्वच्छता, वृक्षारोपण यांसह विविध उपक्रम राबविले जातात. अशा उपक्रमांमधून युवकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होऊन त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर, उपप्राचार्य प्रा. डॉ. आशिष गुजराथी, प्रा. डॉ. प्रकाश लभाणे, मा. अरुण संदनशिव (मुख्याध्यापक, महिला मंडळ, चोपडा), प्रा. डॉ. संबोधी देशपांडे, प्रा. डॉ. उत्तम सोनकांबळे, प्रा. डॉ. मोहिनी उपासनी, प्रा. डॉ. कल्पना सोनवणे यांच्यासह प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थिनी नंदिनी पवार हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, उपप्राचार्य, NSS कार्यक्रम अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
