ब्रेकिंग
गीतांमधून संविधानाचा जागर जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे प्रा. डॉ. उत्तम सोनकांबळे यांचे प्रतिपादन; लासूर येथे समाजकार्य विद्यार्थ्यांचा प्रबोधनात्मक उपक्रम

चोपडा प्रतिनिधी : भारतीय संविधानाची ओळख सर्वसामान्य जनतेला करून देण्यासाठी संविधानाचा व्यापक प्रचार-प्रसार होणे आवश्यक आहे. संविधानाचे महत्त्व केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता ते सामान्य जनतेपर्यंत विविध माध्यमांतून पोहोचविणे गरजेचे आहे. यासाठी गीत, लोकगीते आणि प्रबोधनात्मक सादरीकरणाच्या माध्यमातून संविधानाचा जागर करणे प्रभावी ठरू शकते, असे प्रतिपादन समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथील प्रा. डॉ. उत्तम सोनकांबळे यांनी केले.
समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथील तृतीय वर्ष समाजकार्य स्नातकच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रकार्याच्या अनुषंगाने लासूर ग्रामपंचायतीसमोर संविधान जनजागृतीपर छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. सोनकांबळे बोलत होते.
कार्यक्रमादरम्यान तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्ये, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये आणि संविधानाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध प्रबोधनात्मक गीते व लोकगीते सादर करून संविधानाचा जागर केला. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथील प्रा. डॉ. राहुल निकम यांच्यासह लासूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी अमोल महाजन, चेतन महाजन तसेच ग्रामस्थ व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ. राहुल निकम यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी क्षेत्रकार्याच्या माध्यमातून राबविलेल्या या संविधान जनजागृती उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *