सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर पारोळा नगर परिषदेत आढावा बैठक उपाध्यक्ष मा. मुकेशजी सारवान यांच्या उपस्थितीत कामगारांच्या अडी-अडचणींवर सकारात्मक चर्चा; निवेदनांवर योग्य निर्णय घेण्याचे आदेश
पारोळा : पारोळा नगर परिषद, पारोळा येथे दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्या तसेच त्यांच्या विविध अडी-अडचणींचे निवारण करण्याच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस मा. मुकेशजी सारवान साहेब – उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोग, मुंबई तसेच त्यांचे विशेष कार्य अधिकारी मा. राजेश सोनवणे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या, सेवा विषयक प्रश्न तसेच कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडी-अडचणी याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. कामगारांच्या समस्या जाणून घेत त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी संबंधित विषयांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी भारतीय सफाई कामगार संघटना, जळगाव यांच्या वतीने जिल्हा सरचिटणीस – संतोष संदानशिव यांच्यासह दिपक संदानशिव, राजेश कल्याणी, जगदीश संदानशिव, सुनिल गढरे, मिलींद संदानशिव, करण चव्हाण व इतर संघटना पदाधिकारी यांनी विविध मागण्यांसंदर्भात निवेदने सादर केली.
सदर निवेदनांमधील मागण्यांवर मा. आयोग साहेबांच्या आदेशान्वये कामगारांच्या हिताचा विचार करून योग्य ते निर्णय घेण्यात आले. त्यामुळे सफाई कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सफाई कामगारांच्या समस्या व मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी घेण्यात आलेल्या या बैठकीमुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
