ब्रेकिंग
ॲड. ललिता पाटील स्कूलची दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत १००% निकालाची परंपरा कायम

 

शाळेची विद्यार्थिनी अक्षरा भामरे ९८.२०% मिळवत अमळनेर- पारोळा विभागात प्रथम तर जिल्ह्यात पाचवी

प्रतिनिधी | अमळनेर 

              येथील ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा २०२५-२६ निकाल शंभर टक्के (१००% ) लागला.माध्यमिक विभागातून अक्षरा भामरे हिने ९८.२०% मिळवत सीबीएसई बोर्डाच्या परिक्षेत अमळनेर-पारोळा विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यासह इयत्ता दहावीच्या निकालात पुढील ५ विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले. पलक पाटील ९६.४०% मोहित पवार ९५.२०% नैतिक सेनानी ९५.२०% व वैष्णवी माळी ९४.४०% मिळवत प्रथम पाच मध्ये येण्याचा मान पटकावला आहे. 

        अक्षरा हिने इंग्लिश आणि माहिती तंत्रज्ञानात १०० पैकी १०० तर पलक पाटील हिने मराठीत १०० पैकी १०० गुण मिळवले. यावर्षी देखील सीबीएसई माध्यमिक विभागात शाळेने पंचक्रोशीत १००% निकालाची परंपरा कायम राखली असून इयत्ता दहावीच्या निकालात नेत्रदीपक गुण मिळवुन घवघवीत यश संपादन केले. परीक्षेत एकूण १०५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विद्यार्थ्यांच्या यशात सर्व विषय शिक्षकांसह इतर सर्व शिक्षकांनी देखील मेहनत घेतली असून विद्यार्थ्यांच्या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा ॲड.ललिता पाटील, सचिव प्रा.श्याम पाटील संचालक पराग पाटील व प्रा देवेश्री आणि प्राचार्य डॉ.नीरज चव्हाण यांनी कौतुक व अभिनंदन केले.

१०० टक्के निकालासहित स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता दहावीच्या सीबीएसई परीक्षेत दबदबा कायम.

 

– शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये मार्च महिन्यात झालेल्या दहावीच्या सीबीएसई परीक्षेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचे नाव उंचावले आहे. यंदाच्या निकालात विद्यार्थ्यांनी उज्ज्वल कामगिरी करत गुणवत्तेची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

या परीक्षेत सिद्धी भानुदास पाटील हिने 96.6% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. चैतन्य वारके हिने 96.2% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर निशा पाटील व मानसी पाटील यांनी प्रत्येकी 95.8% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.

शाळेच्या एकूण 40 विद्यार्थ्यांपैकी 11 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळवले असून 19 विद्यार्थ्यांनी 85% पेक्षा जास्त गुण मिळवत मिळवले आहे. तसेच सर्व विद्यार्थी हे विशेष प्राविण्यसहित उत्कृष्ट श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावला आहे.

या यशाबद्दल शाळेचे मार्गदर्शक श्री बजरंग जी अग्रवाल, संस्थापक अध्यक्ष नीरज अग्रवाल, अध्यक्षा सौ सीतिका अग्रवाल, व्यवस्थापन सदस्या ममता अग्रवाल, आचल अग्रवाल, चेअरमन डी डी पाटील सर, मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. शाळेतील शिक्षकांनी नियमित सराव परीक्षा व मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची भक्कम तयारी करून घेतल्यामुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.

पालकांनीही शाळेच्या शैक्षणिक पद्धतीचे व शिक्षकांच्या मेहनतीचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

या घवघवीत निकालामुळे स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अमळनेर मध्ये पुन्हा एकदा धुरंदर ठरले आहे.

युवा कल्याण प्रतिष्ठानने केला महापुरुषांच्या विचारांचा जागर

 

महात्मा ज्योतिराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने युवा कल्याण प्रतिष्ठान,अमळनेर ने वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. वकृत्व स्पर्धेचे विषय होते (एक) महात्मा ज्योतिराव फुले जीवन व कार्य (दोन) डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन व कार्य. स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 1000 रुपयांचे तर द्वितीय 750 व तृतीय 500 शिवाय प्रमाणपत्र. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा डॉ लीलाधर पाटील, प्रा डॉ राहुल निकम, अशोक बिऱ्हाडे यांनी काम पाहिले. महापुरुषांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी युवा वक्ते तयार व्हावेत म्हणून सदर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत प्रथम क्रमांक अखिलेश मनोज पाटील,द्वितीय क्रमांक सायली योगराज पाटील तर तृतीय क्रमांक पल्लवी रामकृष्ण पाटील यांनी पटकावला.स्पर्धेच्या बक्षिसाचे प्रायोजकत्व अनुक्रमे शाम जयंतराव पाटील, वंदना ठेंग व चिंधु वानखेडे यांनी स्वीकारले होते. विजेत्या स्पर्धकांना गोकुळ पाटील( माजी केंद्रप्रमुख) हरिश्चंद्र कढरे, प्रा अशोक पवार,दयाराम पाटील,बापूराव ठाकरे यांच्या हस्ते बक्षिसांचे व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हृदयनाथ मोरे, मिलिंद निकम, संजय पाटील आदींनी परिश्रम घेतले. स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सदर कार्यक्रम विठ्ठल नगर येथील अभ्यासकेत सपन्न झाला 

कन्हेरेत भूमीमाता पूजनातून सेंद्रिय शेतीचा जागर; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 

अमळनेर : तालुक्यातील कन्हेरे येथे भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियानाच्या जनजागर रथाचे आगमन होताच शेतकरी बांधवांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद देत भूमीमाता पूजनाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे बहुमोल सहकार्य लाभले.

बुधवार, दि. १५ एप्रिल रोजी सकाळी चिंचदेवी मंदिराच्या सभामंडपात आयोजित कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत अरुण नेरकर यांच्या हस्ते विधिवत भूमीमातेचे पूजन करण्यात आले. विविध गावांतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील माती आणून एकत्रित पूजन केल्याने कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक व सामाजिक रंग प्राप्त झाला.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रफुल्ल पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी राजेश बोरसे, उप कृषी अधिकारी दिनेश पाटील, ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक भूषण पाटील, मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, मनोहर तायडे, तसेच मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी, गणेश जोशी आणि सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सुबोध पाटील यांनी भूमी सुपोषण चळवळीची पार्श्वभूमी स्पष्ट करत सेंद्रिय शेतीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विविध गावांमधून संकलित मातीचे एकत्र पूजन करण्यात आले.

कृषी अधिकारी प्रफुल्ल पाटील यांनी रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे शेती, शेतकरी व पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देत सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. भूषण पाटील यांनी निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, ट्रायकोडर्मा, रायझोबियम व बीज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. तसेच शासनाच्या विविध जैविक शेती उपक्रमांची माहितीही शेतकऱ्यांना देण्यात आली.

या अभियानांतर्गत जनजागर रथाने कन्हेरेसह फापोरे बुद्रुक, हिंगोणे खुर्द, सडावण बुद्रुक, कोळपिंप्री या गावांनाही भेट देत शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीबाबत जागर निर्माण केला. ध्वनिक्षेपकाद्वारे माहिती प्रसारित करत, पत्रके वाटप करून आणि शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करत या अभियानाला व्यापक प्रतिसाद मिळाला.

भूमीमातेच्या संवर्धनासाठी आणि शाश्वत शेतीसाठी सेंद्रिय पद्धतीचा स्वीकार करणे काळाची गरज असल्याचा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

 

अमळनेर : प्रबुद्ध विहार, अमळनेर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक नेते श्री. मनोहर नाना निकम यांच्या शुभहस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला खौशी येथील अरुण बापू देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे तालुका अध्यक्ष डी. एम. पाटील, सेवानिवृत्त शिक्षक व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त चिंधू दादा वानखेडे, तसेच संजय सूर्यवंशी (पारोळा) आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही एका पक्षाचे किंवा व्यक्तीचे नव्हते, तर ते सर्वसामान्य जनतेचे नेते होते. मानवता, समता आणि बंधुभाव यांचा संदेश त्यांनी समाजाला दिला असून त्यांच्या विचारांवरच देशाची वाटचाल सुरू आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी या महान महामानवाला कोटी कोटी प्रणाम करून अभिवादन करण्यात आले. 🙏

पाडळसरे धरण जन आंदोलन समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 

अमळनेर (जळगाव) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे आज शहरात उत्साहपूर्ण वातावरणात जयंती साजरी करण्यात आली.या

वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उभारण्यात आलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, नगरसेवक प्रताप साळी, सुनील पाटील, देविदास देसले, नरेंद्र पाटील, सुनील भोई, महेश पाटील, नारायण बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान ‘जय भीम’ तसेच ‘बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी समितीचे कार्यकर्ते आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

एकूणच, सामाजिक समता आणि न्यायाचा संदेश देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत ही जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.

 

अमळनेर नगरपालिकेत ‘शौर्य आणि विचारांचा जागर’; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व अग्निशमन दिन उत्साहात साजरा!

अमळनेर नगरपरिषद अग्निशमन दलाच्या वतीने आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि ‘राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन’ मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला. स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.

​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांची विशेष उपस्थिती लाभली. यासोबतच मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगरसेवक नाविद शेख, मोहन सातपुते, गुलाब पाटील, भरतसिंग परदेशी, योगराज सदाशिव, दीपक चौगुले, तुळशीराम हटकर, सोमचंद संदनशिव, सुधीर चौधरी, अनिल बेंडवाल, राहुल कंजर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी व दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

​महामानवाला अभिवादन आणि जवानांचा सन्मान

​कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी बाबासाहेबांच्या विचारांचे आणि राष्ट्रनिर्मितीमधील त्यांच्या महान योगदानाचे स्मरण करण्यात आले.

​१४ एप्रिल हा दिवस देशभर ‘अग्निशमन सेवा दिन’ म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त अमळनेर अग्निशमन दलाच्या जवानांच्या शौर्याचा, तत्परतेचा आणि निःस्वार्थ सेवाभावाचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर म्हणाले की,

​”अग्निशमन दल हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असते. कोणतीही आपत्ती असो, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे जवान जनसेवेसाठी धावून जातात. त्यांच्या या अजोड कार्याचा समाजाने नेहमीच सन्मान राखला पाहिजे.”

​अतिशय उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने समाजप्रबोधन आणि कर्तव्यभावनेचा एक नवा आदर्श घालून दिला.

समता, स्वाभिमान आणि संविधान मूल्यांचा जागर: अमळनेरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा प्रेरणादायी सोहळा

‘चवदार तळे’ नाटिकेतून सामाजिक न्यायाचा संदेश; विविध उपक्रमांनी जयंतीला मिळाला वैचारिक आयाम

अमळनेर, दि. १४ — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अमळनेरात आयोजित कार्यक्रम केवळ औपचारिक अभिवादनापुरता मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा ठरला. शहरातील विविध स्तरांतील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभागी होत समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा जागर केला.

सकाळी आठ वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आमदार अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त करून देणारी ठरली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून बाबासाहेबांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. “शिक्षण, संघटन आणि संघर्ष” हा बाबासाहेबांचा संदेश आजही समाजाला दिशा देणारा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. संविधानाने दिलेल्या अधिकारांची जाणीव ठेवत कर्तव्यांचीही जपणूक करण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते युवा कल्याण प्रतिष्ठान आणि संविधान जागर अभियान यांच्या वतीने सादर करण्यात आलेली ‘चवदार तळे’ ही नाटिका. या नाटिकेतून ऐतिहासिक संघर्षाचे प्रभावी चित्रण करत सामाजिक समतेचा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आला. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे कौतुक केले.

याशिवाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेच्या वतीने आयोजित निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यामुळे युवकांमध्ये बाबासाहेबांच्या विचारांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला.

महिलांची लक्षणीय उपस्थिती, युवकांचा उत्साह आणि विविध सामाजिक संघटनांचा सहभाग यामुळे हा सोहळा सर्वसमावेशक ठरला. कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांची केवळ आठवण न ठेवता त्यांची अंमलबजावणी करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

एकूणच, अमळनेरातील हा जयंती सोहळा सामाजिक बांधिलकी, वैचारिक जागर आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करणारा ठरला.

अमळनेरात जयंती महोत्सवानिमित्त भव्य मॅरेथॉन; आरोग्य, एकात्मता आणि प्रेरणेचा उत्सव

 महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्पर्धा; शहरासह परिसरातून उत्स्फूर्त सहभाग

अमळनेर : क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त अमळनेर शहरात आयोजित करण्यात आलेली भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात पार पडली. या स्पर्धेत शहरासह परिसरातील अनेक धावपटूंनी सहभाग घेत सामाजिक ऐक्य आणि निरोगी जीवनाचा संदेश दिला.

स्पर्धेचे उद्घाटन अमळनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, PSI काकडे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद सदनशिव, सिद्धार्थ शिसोदे तसेच पत्रकार किरण पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. सकाळच्या उत्साही वातावरणात सुरू झालेल्या या स्पर्धेत युवक, युवती आणि विविध वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

पुरुष गटात नाशिकच्या तेसज सपकाळे यांनी उत्कृष्ट धाव करत प्रथम क्रमांक पटकावला. ऋषिकेश वारुडे (नाशिक) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, तर नंदुरबार जिल्ह्यातील धडगावचे खुमानसिंग ठाकरे यांनी तृतीय क्रमांक मिळवत आपली छाप उमटवली. विजेत्यांना अनुक्रमे ७०००, ५००० आणि ३००० रुपयांची रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

महिला गटातही स्पर्धकांनी उल्लेखनीय कामगिरी केली. उन्नती पाटील यांनी प्रथम, आरती पाटील यांनी द्वितीय आणि ज्योती महाजन यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना अनुक्रमे ५०००, ३००० आणि २००० रुपयांची पारितोषिके प्रदान करण्यात आली.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जयंती महोत्सव समिती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद, अमळनेर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशासाठी अध्यक्ष नरेंद्र रामभाऊ संदानशिव यांच्यासह अविनाश संदानशिव, गौतम मोरे, देवदत्त संदानशिव, सुनील वाघ, सुनील करंदीकर, गोपीचंद चव्हाण, राहुल संदानशिव, श्रीचंद चव्हाण, सतीश सोनवणे, ज्ञानेश्वर संदानशिव, गोकुळ बिऱ्हाडे, प्रा. कृष्णा संदानशिव, नितीन संदानशिव, स्वप्नील पाटील, भिका संदानशिव, राजेंद्र संदानशिव, समाधान बिऱ्हाडे, सिद्धार्थ मोरे, दिनेश संदानशिव, जितेश संदानशिव, तुषार संदानशिव, परम चव्हाण, शुभम घोलप, अभिषेक संदानशिव, प्रेम बैसाने, सागर बिऱ्हाडे, सुमेध मोहिते, दीपक सोनवणे, विजय संदानशिव, गणेश ब्रह्मे, काशिनाथ संदानशिव, संदीप सदानशिव, संदीप वाघ, राजरत्न सोनवणे, नाना पाटील आदींनी सहकार्य केले.

महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रप्रभा नेतकर, नीलिमा जाधव, अनिता नगराळे, किरण चव्हाण, वर्षा चव्हाण, सुनंदा संदानशिव, दिपाली संदानशिव, सोनल पवार, नितल चव्हाण, गौतमी चव्हाण आदींची उपस्थिती लक्षणीय होती.

ही मॅरेथॉन स्पर्धा केवळ क्रीडा उपक्रम न राहता सामाजिक एकात्मता, प्रेरणा आणि महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करणारे प्रभावी व्यासपीठ ठरली.

भव्य यशाची नोंद! ‘प्रताप’मध्ये सामान्य ज्ञान परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 भगवान महावीर, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संयुक्त उपक्रम; १४४ विद्यार्थ्यांचा सहभाग

अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात करिअर कौन्सिलिंग सेंटर, युवती सभा आणि आई जिजाऊ अभ्यासिका यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी भव्य सामान्य ज्ञान परीक्षा उत्साहात संपन्न झाली. भगवान महावीर, महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय प्रतिसाद लाभला.

सकाळी १० ते ११:३० या वेळेत पार पडलेल्या या परीक्षेत एकूण १४४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून ज्ञानस्पर्धेला रंगत आणली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, सिनेट सदस्य डॉ. धीरज वैष्णव, रेक्टर डॉ. अमित पाटील, डॉ. माधव भुसनर, प्रा. भानुदास गुलाले व डॉ. आर. सी. सरवदे यांच्या हस्ते पूजन पार पडले.

यावेळी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव यांच्या उपस्थितीत महाविद्यालयाच्या कार्यालयातही प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नेमक्या वेळेत सामान्य ज्ञान परीक्षेला सुरुवात झाली. कार्यक्रमास सीसीएम प्रमुख डॉ. विजय तुंटे, डॉ. धनंजय चौधरी, प्रा. सुनिल पाटील, प्रा. पंकज तायडे, डॉ. ज्ञानेश्वर कांबळे, डॉ. रवी बाळसकर, डॉ. अनिल झळके, डॉ. रामदास सुरळकर, प्रा. दिपक कोकणी आदी मान्यवर उपस्थित होते.

या परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. बालाजी कांबळे, दिलीप शिरसाट, पराग पाटील, प्रा. हिमांशू गोसावी, विशाल अहिरे, डॉ. राखी घरटे, प्रा. इशिता घोष आणि तुषार संजय पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली असून प्रथम क्रमांकासाठी रुपये १०००, द्वितीयसाठी ७०० आणि तृतीयसाठी ५०० रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता सीसीएमसी विभागात होणार असून सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

test
casino utan svensk licens