ब्रेकिंग
अमळनेरमध्ये स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत कचरा वेचकांसाठी भव्य कार्यशाळा संपन्न

अमळनेर (दि. २२ एप्रिल २०२६) — स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत, स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत क्षमता बांधणी घटकाच्या माध्यमातून अमळनेर नगर परिषदेतर्फे कचरा वेचकांसाठी एक व्यापक कार्यशाळा उत्साहात पार पडली. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) आणि अमळनेर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा उपक्रम इंदिरा गांधी भवन येथे दुपारी २ ते सायं. ५.३० या वेळेत आयोजित करण्यात आला.

या कार्यशाळेचे आयोजन मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे व नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाला शहरातील घंटा गाडी चालक, मदतनीस, घनकचरा प्रक्रिया केंद्रातील कर्मचारी व सुपरवायजर यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला.

प्रशिक्षणासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालयामार्फत नियुक्त कुशाग्र फाऊंडेशनच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यात नमस्ते योजना, NULM, ई-श्रम कार्ड, आधार नोंदणी, बचत गट स्थापन, घनकचऱ्यातील उद्योजकतेच्या संधी तसेच RRR केंद्र यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश होता.

या कार्यशाळेचा मुख्य उद्देश कचरा वेचकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे, त्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक प्रगतीस चालना देणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा होता. तसेच जागतिक पृथ्वी दिनाच्या निमित्ताने घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरणीय बदल याबाबत जनजागृती करण्यात येऊन उपस्थितांना हरित शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागींचा सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

या उपक्रमावेळी स्वच्छता निरीक्षक श्री. संतोष जाधव, श्री. किरण कंडारे, शहर समन्वयक श्री. गणेश गढरी, कुशाग्र फाऊंडेशनचे श्री. देवेंद्र केळोदे, श्री. मुकेश चव्हाण, श्री. प्रज्ज्वल शेवलकर तसेच युनुस शेख, अनंत संदानशिव, जया सरदार, घनकचरा सुपरवायजर श्री. खलील शहा व राजेंद्र गोलहीत आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वच्छतेकडून समृद्धीकडे, अमळनेरची ठाम वाटचाल!

अमळनेर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाचा सेवा सप्ताह साजरा 

 

अमळनेर :- येथील नगरपरिषदेच्या ‘ अग्निशमन विभागातर्फे ‘ दिनांक 14 ते 20 एप्रिल दरम्यान अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात आला. त्यानिमित्त अमळनेर साजरा झालेल्या आखाजी महोत्सवात ‘ अग्निशमन सप्ताह अंतर्गत ‘ जनजागृती पर स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलमध्ये अग्निशमन विभागाचे विविध प्रकारचे बचावासाठी लागणाऱ्या साहित्यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. तेथे ठेवण्यात आलेल्या विविध उपकरणांची माहिती नागरिकांना करून देण्यात येत होती.

              नागरिकांना अग्निशमन विभाग काय आहे हे कसे कार्य करते, सुरक्षिततेच्या दृष्टीने काय उपाययोजना आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. नागरिकांनी प्रत्यक्ष साहित्य पाहून अग्निशमन विभाग आपल्या सेवेसाठी किती तत्पर आहे याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या सर्व उपकरणांची माहिती अग्निशमन विभाग प्रमुख गणेश गोसावी, कर्मचारी दिनेश बिराडे, जाफर पठाण, फारुख शेख, मच्छिंद्र चौधरी, आकाश संदनशिव यांनी करून दिली.

                  अग्निशमन विभागाच्या या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

अमळनेरात भूमी सुपोषण अभियानाची भक्तीमय सांगता; शेतकऱ्यांना माती संवर्धनाचा संदेश

 

अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात रविवारी, दि. 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीया निमित्त भूमी सुपोषण अभियान राष्ट्रीय चळवळीच्या मासिक जनजागर सोहळ्याची अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली. अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या अभियानाला शेतकरी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या अभियानाचा शुभारंभ वर्षप्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, दि. 19 मार्च 2026 रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. महिनाभर चाललेल्या या जनजागर उपक्रमाची सांगता समारंभपूर्वक पार पडली.

सांगता सोहळ्यास प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, कृषिभूषण सौ. राजश्री पाटील, पोलीस पाटील विश्वास महाजन, माजी उपसरपंच पुंजू पाटील, कृषी विभागाचे अधिकारी योगेश वंजारी, दिनेश पाटील, दीपक चौधरी यांच्यासह मंगळग्रह सेवा संस्थेचे पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात विविध गावांतील शेतकऱ्यांनी आणलेल्या मातीचे एकत्रीकरण करून करण्यात आली. या मातीपासून मंडल तयार करून मंत्रोच्चाराच्या माध्यमातून भूमी शुद्धीकरण व अभिमंत्रण विधी पार पडला. गणपती पूजन, संकल्प आणि विधिवत पूजा करून भूमी अभिमंत्रित करण्यात आली.

यानंतर ही अभिमंत्रित माती पाकिटांमध्ये भरून उपस्थित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात वापरण्यासाठी देण्यात आली. यावेळी शेतजमिनीचा पोत सुधारण्यासाठी आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी माती संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच हा संदेश गावागावांत पोहोचवून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

भूमिपूजन सोहळ्याचे पौरोहित्य मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव, जयेंद्र वैद्य व गणेश जोशी यांनी केले. त्यांना सेवेकरी उमेश पाठक, अमोल पाटील व पदमसिंग पाटील यांनी सहकार्य केले.या अभियानामुळे शेतकऱ्यांमध्ये मातीच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन शाश्वत शेतीच्या दिशेने सकारात्मक पाऊल पडत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

अमळनेरच्या शंतनू वाघमारे यांची जागतिक झेप — स्थानिक अनुभवांना मिळाले ग्लोबल व्यासपीठ

अमळनेरच्या मातीतून उठलेला आवाज आता थेट जागतिक व्यासपीठावर घुमला आहे—आणि त्यामागे आहे एक तरुण, संवेदनशील आणि जिद्दी चेहरा: शंतनू वाघमारे

अमळनेर : छोट्या शहरातील वास्तव, सामान्य माणसांच्या अडचणी आणि हवामान बदलाचा थेट परिणाम—हे सगळं आता केवळ स्थानिक चर्चेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. अमळनेरच्या शंतनू वाघमारे यांनी हा आवाज थेट ग्लोबल सिटिझन असेंब्ली (GCA)पर्यंत पोहोचवून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

जानेवारी ते मार्च दरम्यान पार पडलेल्या या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात जगभरातील नागरिक हवामान बदल आणि अन्न व्यवस्थेवर विचारमंथन करतात. या प्रतिष्ठित मंचावर शंतनू यांनी अमळनेर आणि आसपासच्या भागातील वास्तव मांडत स्थानिक समस्यांना जागतिक परिप्रेक्ष्यात स्थान मिळवून दिले.

स्थानिक ते जागतिक — आधार संस्थेची साथ

या प्रवासात *आधार संस्था* यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. आवश्यक कागदपत्रे, समन्वय, आणि स्थानिक माहिती उपलब्ध करून देत संस्थेने शंतनूंना भक्कम पाठबळ दिले. ग्रामीण आणि छोट्या शहरांमध्ये हवामान बदलाचे भासणारे परिणाम—जसे वाढती उष्णता, अनियमित ऋतू, आणि त्याचा शेती व रोजंदारीवर होणारा परिणाम—हे सर्व मुद्दे प्रभावीपणे मांडले गेले.

भाषांतरापलीकडे जाऊन आवाजाला दिली ताकद

शंतनू यांचे योगदान केवळ भाषांतरापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी स्थानिक लोकांच्या भावना, अनुभव आणि संघर्ष जागतिक पातळीवर स्पष्ट आणि प्रभावीपणे पोहोचवले. त्यामुळे चर्चेत केवळ तांत्रिक किंवा धोरणात्मक मुद्दे नव्हते, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्याचा वास्तव देखील समोर आले.

रिक्षाचालक किशोर पाटील यांचा आवाजही पोहोचला जगभर

या सत्रांमध्ये अमळनेरचे रिक्षाचालक किशोर पाटील यांनी स्वतःचे अनुभव मांडले. त्यांच्या साध्या पण वास्तववादी शब्दांतून हवामान बदलाचे दैनंदिन आयुष्यावर होणारे परिणाम स्पष्ट झाले.

 “आम्ही मोठ्या शब्दांत बोलत नाही, पण बदल दिसतोय… ऋतू बदलले आहेत, उष्णता वाढली आहे, आणि त्याचा आमच्या कामावर परिणाम होतो,” असे किशोर पाटील यांनी सांगितले.

शंतनूंनी त्यांच्या या भावना आणि अनुभवांना जागतिक मंचावर पोहोचवले—आणि त्यामुळे ‘सामान्य माणूस’ही या चर्चेचा केंद्रबिंदू बनला.

हवामान बदल आणि अन्न व्यवस्था — एक महत्त्वाची कडी

या चर्चांमध्ये हवामान बदल आणि अन्न व्यवस्थेतील संबंधावरही सखोल विचारमंथन झाले. बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम, अन्न उत्पादनातील अनिश्चितता आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले.

अमळनेरचा अभिमान — जागतिक स्तरावर ठसा

शंतनू वाघमारे यांचा हा सहभाग केवळ वैयक्तिक यश नाही, तर अमळनेरसारख्या छोट्या शहरासाठीही अभिमानाची बाब आहे. त्यांनी दाखवून दिले की, स्थानिक स्तरावरचे प्रश्न आणि अनुभव योग्य व्यासपीठ मिळाल्यास जागतिक चर्चेतही प्रभाव निर्माण करू शकतात.

 “किशोरसारख्या लोकांचे आवाज जगापर्यंत पोहोचले पाहिजेत. हवामान बदलाचा खरा परिणाम आकड्यांमध्ये नाही, तर लोकांच्या आयुष्यात दिसतो,” असे शंतनू वाघमारे यांनी ठामपणे सांगितले.

निष्कर्ष : अमळनेरच्या मातीतील वास्तव आता जागतिक चर्चेचा भाग बनले आहे. शंतनू वाघमारे यांची ही कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे—कारण बदलाची सुरुवात नेहमी आपल्या आसपासच्या जगातूनच होते.

 

अमळनेरमध्ये बालविवाह रोखण्यासाठी व्यापक सतर्कता अभियान

 

अमळनेर (जि. जळगाव) – अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी अमळनेर येथे महत्त्वपूर्ण सतर्कता अभियान राबविण्यात आले. जिल्हाधिकारी रोहन घुगे व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलीस स्टेशन, आधार बहुउद्देशीय संस्था आणि पुरोहित संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समितीच्या साने गुरुजी सभागृहात बैठक पार पडली.

या बैठकीत अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या विवाहांमध्ये मुला-मुलींचे वय काटेकोरपणे पडताळण्याचे आवाहन करण्यात आले. विवाहापूर्वी आधार कार्ड, शाळेचा दाखला व जन्मदाखला तपासूनच मुहूर्त देण्याची जबाबदारी धर्मगुरू व पुरोहितांनी पार पाडावी, असे स्पष्ट करण्यात आले.

यावेळी अमळनेर पोलीस स्टेशनच्या पीएसआय कविता ठाणगे यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच पॉक्सो (POCSO) कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. बालविवाह घडवून आणणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी दिला. पोलीस कॉन्स्टेबल शामल पारधी यांचीही उपस्थिती होती.

आधार बहुउद्देशीय संस्थेच्या संचालक रेणू प्रसाद यांनी बालविवाहासोबतच बाल तस्करी, लैंगिक शोषण आणि बालमजुरी यांसारख्या गंभीर समस्यांवर मार्गदर्शन केले. या अभियानाचा विस्तार संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे करण्याबाबत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील, प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, मोहिनी धनगर, दीपक विश्वेश्वर, उर्जिता शिसोदे, दीप्ती गायकवाड, अश्विनी भदाणे, भावना सूर्यवंशी आदींसह पुरोहित संघाचे निलेश जोशी, श्रीकांत पाठक, हरिश्चंद्र जोशी, प्रफुल जोशी, अरविंद नाईक, अक्षय नाईक, ज्ञानेश्वर भावे, प्रदीप कुमार जोशी, प्रशांत जोशी, महेश कुलकर्णी, नंदकुमार जहांगीदार, सुनील जोशी, सारंग गर्गे व मंगेश काळकर उपस्थित होते.

बालविवाहमुक्त समाज घडविण्यासाठी प्रशासन, पोलीस, सामाजिक संस्था आणि धर्मगुरू यांनी एकत्रितपणे घेतलेला हा पुढाकार महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

 

अमळनेरात आखाजी महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद; अहिराणी संस्कृतीच्या जतनासाठी शासकीय पाठबळाची गरज – राजेश पांडे

 

अमळनेर : खान्देशाची ओळख असलेल्या आखाजी महोत्सवाने यंदा अमळनेरात अभूतपूर्व उत्साहात रंगत घेतली. अहिराणी संस्कृतीतील गौराई, झोक्यावरची गाणी, जात्यावरची गाणी अशा पारंपरिक रूढी-परंपरांचे जतन व संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी केले. या महोत्सवाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता हा उपक्रम शासकीय स्तरावर आणि मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

खान्देश साहित्य संघाच्या वतीने अमळनेर येथील एलआयसी कॉलनीत आयोजित पहिल्या आखाजी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी होते.

राजेश पांडे पुढे म्हणाले, “अमळनेर सोडून ३८ वर्षे झाली असली तरी अहिराणी भाषेची गोडी अजूनही तितकीच आहे. त्यामुळेच मी आज अहिराणीतून संवाद साधत आहे. आधुनिक युगातही महिलांनी या परंपरा जपल्या पाहिजेत, ही काळाची गरज आहे.”

यावेळी आमदार अनिल पाटील यांनी महिलांनी परंपरा जतन केल्याबद्दल अभिमान व्यक्त केला, तर माजी आमदार साहेबराव पाटील यांनी अहिराणीतील फटकेबाजीने उपस्थितांचे मनोरंजन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष शरद धनगर यांनी केले, तर स्वागतपर भाषण स्वागताध्यक्ष तथा कृउबा सभापती अशोक आधार पाटील यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य संघाचे सचिव रमेश बोरसे, खजिनदार प्राचार्या रत्नाताई पाटील, जेष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील, कवी हिरामण कंखरे, गोकुळ बागुल, शाहीर नाना पाटील, भाऊसाहेब देशमुख, जयवंतराव पाटील, डॉ. अनिल शिंदे, दिनेश नाईक, एल.टी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सभापती अशोक पाटील, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, ऍड. व्ही.आर. पाटील, माजी नगरसेवक विक्रांत पाटील, डॉ. अविनाश जोशी, डॉ. डिगंबर महाले, सचिन पाटील, अमेय मुंदडा, रिता बाविस्कर, राजू फपोरेकर, ज्ञानेश्वर धनगर, जयेशकुमार काटे आदींचे सहकार्य लाभले.

महोत्सवात पारंपरिक पद्धतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. पुरणपोळी स्पर्धेत प्रतिभा चौधरी प्रथम, नयना पाटील द्वितीय, तर मंगल सोनवणे तृतीय ठरल्या. झोक्यावरच्या गाण्यांमध्ये मेघना पवार व दीपिका पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. उखाणे वेशभूषा स्पर्धेत विजयाताई पाटील प्रथम ठरल्या. आरास स्पर्धेत जिजाऊ ग्रुपने बाजी मारली.

घट्यावरच्या गाण्यात रंजना महाजन प्रथम, तर चित्रकला स्पर्धेत आशा दुसाने व लता दुसाने यांनी द्वितीय, श्यामल पाटील व कल्पना देवरे यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

स्पर्धांचे परीक्षक म्हणून वसुंधरा लांडगे, प्रा. शीला पाटील, लीना पाटील, सुरेखा बाविस्कर, दर्शना पवार, बोरकर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन संजय पाटील व पूनम बेडसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उमेश काटे यांनी केले.

अमळनेरात पहिल्यांदाच भरलेल्या या आखाजी महोत्सवाने अहिराणी संस्कृतीच्या जतनासाठी नवा आदर्श निर्माण केला असून, भविष्यात हा महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात साजरा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

अमळनेर मध्ये प्रथमच प्रातः कालीन संगीतमय मैफिलीचे आयोजन

 

अमळनेर ( प्रतिनिधी) येथील प्रसिद्ध सुवर्णपेढी ‘ पारस गोल्ड ‘ यांच्या वतीने अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ‘ स्वर चैतन्य ‘ या संगीतमय मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 19 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता द्वारकाजी कॉम्प्लेक्स, लुल्ला मार्केट अमळनेर येथेही मैफल रंगणार आहे.

                 या संगीतमय मैफिलीचे विशेष आकर्षण म्हणजे किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. आशिष रानडे आणि पं. ज्ञानेश्वर कासार यांची गायकी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे. या संगीतमय मैफिलीला उपस्थितीचे आवाहन पारस गोल्ड चे संचालक विनोद थोरात आणि संदीप थोरात यांनी केले आहे.

              19 77 पासून ग्राहकांच्या विश्वासाला पात्र असलेल्या या सुवर्णपेढीच्या नूतनीकरण निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशस्त अशा दालनात दिनांक 19 ते 21 एप्रिल दरम्यान विशेष टेम्पल दागिन्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यात पेशवाई दागिने, ऐतिहासिक वारसा जपणारी कलाकुसर, राजवाडी ऐतिहासिक दागिने, तसेच राजेशाही दागिन्यांची खरेदी करता येणार आहे. या सोहळ्याला आणि प्रदर्शनाला ग्राहकांनी हजेरी लावावी असे आवाहन पारस गोल्ड तर्फे करण्यात आले आहे.

धार–मालपूर रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते संपन्न

 

तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत धार ते मालपूर या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पडला. आमदार निधी अंतर्गत मंजूर झालेल्या ₹२५ लाखांच्या निधीतून होणाऱ्या या कामाचा शुभारंभ माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाल्याने धार व मालपूर परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः पावसाळ्यात चिखल व खड्ड्यांमुळे होणारी गैरसोय, वाहतुकीतील अडथळे आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आता दूर होणार असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा मजबूत करणे हे आमचे प्राधान्य आहे. रस्ते, पाणी व वीज या सुविधा सक्षम केल्याशिवाय खऱ्या अर्थाने विकास साध्य होत नाही. धार–मालपूर रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील नागरिकांना वर्षभर सुलभ व सुरक्षित प्रवास करता येईल.”

या समारंभास धार व मालपूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महायुतीचे कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

ग्रामस्थांच्या वतीने आमदार पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले. गावाच्या विकासाच्या दिशेने उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार असून भविष्यातही अशा विकासकामांना प्राधान्य देण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

सदर रस्ता पूर्ण झाल्यानंतर परिसरातील शेती उत्पादनांची वाहतूक सुलभ होणार असून शिक्षण, आरोग्य व दैनंदिन व्यवहारांसाठी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. परिणामी, धार व मालपूर परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे शॉर्टसर्किटमुळे शेतीचे झाले नुकसान

 

अमळनेर – तालुक्यातील टाकरखेडा येथे आज दि १७ रोजी दुपारी २ ते २.३० दरम्यान शॉटसर्किट मुळे सुमारे साडेतीन बिघे जमिनीवरील मक्याला आग लागून सुमारे दिड लाखाचे नुकसान झाले आहे.

              टाकरखेडा येथील शेतकरी कैलास आत्माराम पाटील यांच्या साडेतीन बिघे शेतातील मका दुपारी शॉट सर्किट मुळे जळून खाक झाला आहे त्या ठिकाणी शेतकरी नितीन कैलास पाटील,अमोल संजय पाटील, सतीश सुरेश पाटील,मनोहर विश्वास पाटील,संजय शिवाजी पाटील आदींनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला.त्यानंतर महावितरण कंपनीचे सखाराम भिल,पंकज पाटील,तलाठी प्रफुल्ल पाटील,कृषिसहाय्यक श्री. सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली व नुकसानीचे फोटो काढले.

               सदर घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन त्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी शेतकरी कैलास पाटील व गावकऱ्यांनी केली आहे.

आमदार अनिल पाटील यांनी घेतला शेत पानंद रस्त्यांच्या कामांचा सखोल आढावा

 

टँकर मागणीच्या प्रस्तावांना चारच मंजुरी द्या-आमदारांचे आढावा बैठकीत निर्देश

अमळनेर:-तालुक्यातील विकासकामांना गती देण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना अंतर्गत महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली.

        या बैठकीत आमदारांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पानंद रस्त्यांच्या कामांचा सखोल आढावा घेतला. तसेच आगामी उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या परिस्थितीवरही गांभीर्याने चर्चा करण्यात आली. नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले. विशेषतः टँकर मागणी संदर्भात प्राप्त झालेल्या तसेच येणाऱ्या सर्व प्रस्तावांना केवळ चार दिवसांच्या आत मंजुरी देण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना देत प्रशासनाला गती देण्यावर भर देण्यात आला. यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.

      सदर बैठकीत विविध विभागांचे अधिकारी,उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी, बांधकाम, भूमी अभिलेख, पोलीस प्रशासन तसेच पंचायत समितीचे अधिकारी यांनी आपापल्या विभागाचा आढावा सादर केला.समन्वयातून कामे जलदगतीने पूर्ण करण्यावर सर्वांनी एकमत व्यक्त केले. तसेच समिती सदस्य व ग्रामस्थ प्रतिनिधी आपल्या भागातील अडचणी मांडल्या, त्यावर आमदारांनी सकारात्मक भूमिका घेत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

        ही बैठक म्हणजे केवळ आढावा नव्हे, तर शेतकरी व ग्रामीण विकासासाठी घेतलेली ठोस दिशा देणारी पावले असल्याचे स्पष्ट झाले.

        सदर बैठकीत मयूर भंगाळे (उपविभागीय अधिकारी अमळनेर), रुपेश कुमार सुराणा (तहसीलदार अमळनेर), डॉ.उल्हास देवरे (तहसीलदार पारोळा), एन.आर पाटील (गटविकास अधिकारी अमळनेर), विजयकुमार देवरे (उपअधीक्षक भूमी अभिलेख पारोळा), भूषण कदम (गटविकास अधिकारी पारोळा), नीना बाविस्कर (सा.का अधिकारी पारोळा), वैशाली जडे (शाखा अभियंता पंचायत समिती पारोळा), आकाश भाई (ए.पी.ओ पंचायत समिती पारोळा), एस.एस खर्डे (विस्तार आधिकारी पंचायत समिती अमळनेर), डी.जी जाधव (मं.कं अ पारोळा), प्रकाश चव्हाण (पोलीस उपनिरीक्षक अमळनेर- एस डी पी ओ कार्यालय), महेश जाधव (सहायक म.अधिकारी पारोळा), ए.जे.परदेशी (सहाय्यक म. अधिकारी अमळनेर), जितेंद्र बुवा (ए.पी ओ रोजगार हमी योजना पारोळा), वाय.ए.वंजारी (उप कृषी अधिकारी अमळनेर), ए.आर कोठावदे (उप कृषी अधिकारी अमळनेर ), एस.पी.गावित (उपअधीक्षक भूमी अभिलेख अमळनेर), एस.बी.देसले (आर.एफ.ओ पारोळा), एम.डी चव्हाण (एच.क्यू.ए), एच.के.पाटील (उपअभियंता बां.वि. जिल्हा परिषद अमळनेर), पी.ए.पाटील (उपविभागीय सनियंत्रण अधिकारी सा.बां.), गांगुर्डे साहेब (उपविभागीय सनियंत्रण अधिकारी सा.बां.), एस.व्हि.पाटील (ज्युनिअर इंजिनिअर पीडब्ल्यूडी पारोळा) इत्यादी अधिकारी वर्गासह अनिल सिसोदे (समिती सदस्य), रिता बाविस्कर (समिती सदस्य), गौरव उदय पाटील (समिती सदस्य), चेतन काशिनाथ पाटील (समिती सदस्य), महारु आत्माराम पाटील (ग्रामस्थ), सुरेश देवचंद पाटील (ग्रामस्थ), ललित भूपेंद्र बाविस्कर (ग्रामस्थ) आदी उपस्थित होते.

      दरम्यान शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पाणी टंचाईवर मात आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ही बैठक अत्यंत फलदायी ठरली.

test
casino utan svensk licens