ब्रेकिंग
 छत्रपती संभाजी राजांच्या शौर्याचा अमळनेरात महानाट्यद्वारे होणार जागर जय नील फाउंडेशन चा आजपासून होणार शुभारंभ

 

अमळनेर ( प्रतिनिधी ) शहरात शंभूराजांच्या जयंतीदिनी 14 मे रोजी ‘ स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे ‘ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असून संस्कृती फाउंडेशन च्या वतीने आणि जय नील फाउंडेशनच्या सहकार्याने या महानाट्याचे सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार आहे.

सामाजिक बांधिलकी आणि विविध क्षेत्रातील असलेल्या उणिवा भरून काढण्यासाठी अमळनेरात जय नील फाउंडेशन चा दिनांक 14 रोजी शुभारंभ होणारा असून शंभू राजेंच्या जयंतीदिनी संस्थेच्या कार्याचा शुभारंभ होणार असल्याची माहिती युवा उद्योजक तथा आमदार अनिल पाटील यांचे सुपुत्र गौतम पाटील आणि पुतणे वरूण राजेश पाटील यांनी दिली.

गेले महिनाभरापासून स्थानिक कलाकारांना प्रशिक्षण दिले गेले आहे. सिनेमा एक आर्टिफिशियल स्ट्रक्चर असते परंतु महानाट्य ही एक वेगळी संकल्पना असल्याने जिवंत इतिहास प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. आमदार अनिल पाटील व जय निल फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम पाटील, उपाध्यक्ष वरूण पाटील यांनी विशेष असे योगदान दिल्याने आम्हाला बळकटी मिळून जास्तीत जास्त तरुणाईला हे महानाट्य दाखविले जाणार असल्याचे नाट्य कलाकार निकेश राजपूत यांनी सांगितले.

सकाळी दहा वाजता तरुणाई साठी स्वतंत्र प्रयोग

छत्रपती संभाजी राजे हे तरुणांचे आदर्श असल्याने खास महाविद्यालयीन युवक आणि युवतींसाठी दिनांक 14 रोजी सकाळी दहा वाजता स्वतंत्र प्रयोग होणार असून सर्व युवक युवतींनी उपस्थिती द्यावी असे आवाहन गौतम पाटील यांनी केले आहे.

अमळनेर नगरपालिकेचा पाणीपुरवठा उशिराने होणार

अमळनेर ( प्रतिनिधी ) अमळनेर नगरपरिषद पाणीपुरवठा योजनेतील जुन्या मुख्य जलवाहिनीवरील मेन 150 एम एम (6″) इंच व्हॉल्व नादुरुस्त झाला असल्याने सदरील व्हॉल्व दुरुस्त करण्यासाठी बुधवारी युद्ध पातळीवर काम केले जाणार आहे. त्यासाठी मुख्य जलवाहिनी वॉश आऊट करणे आवश्यक आहे. त्यामुळे या वॉल व वरून फरशी रोड, बेलदार मोहल्ला, पान खिडकी, बाहेर पुरा तसेच यात्रेत होणारा पाणीपुरवठा तसेच झामी चौक जलकुंभ, लालबाग जलकुंभ, रामवाडी जलकुंभ, तांबेपूरा जलकुंभ यावरून होणारा पाणीपुरवठा एक दोन दिवस उशिराने होईल याची शहरातील नागरिकांनी नोंद घ्यावी व नगर परिषदेत सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, पाणीपुरवठा विभागाचे सभापती कैलास नामदेव पाटील यांनी केले आहे.

शिक्षण, समाजकार्य व महिला सक्षमीकरणातील उल्लेखनीय कार्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव डॉ. अर्चना सूर्यवंशी यांना ‘इंडिया प्राइड अवॉर्ड’ प्रदान

 

 

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर येथील सूर्या फाउंडेशन तसेच पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि पाळधी येथील नोबेल इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका डॉ. सौ. अर्चना सूर्यवंशी (प्रशांत सूर्यवंशी) यांना शिक्षण, समाजकार्य आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा *‘इंडिया प्राइड अवॉर्ड’* प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

जळगाव येथे आयोजित भव्य *‘सुपर मॉम सुपर वुमन 2026 – सीझन 4’* या पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री Mahima Chaudhry यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जळगावचे आमदार Raju Mama Bhole प्रमुख उपस्थित होते.

दि. ८ मे रोजी जळगाव येथील Hotel President Cottage येथे संपन्न झालेल्या या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन *आर व्ही एंटरटेनमेंट* यांच्या वतीने करण्यात आले होते. संस्थापक सौ. रूपा शास्त्री आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३९ महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक, दर्जेदार आणि संस्कारक्षम शिक्षण मिळावे या ध्येयाने डॉ. अर्चना सूर्यवंशी यांनी उभे केलेले कार्य विशेष प्रेरणादायी ठरले आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान, समाजहितासाठी केलेले सातत्यपूर्ण कार्य तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असलेली त्यांची तळमळ याची दखल घेत त्यांना हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्रदान करण्यात आला.

त्यांच्या या यशाबद्दल शाळा परिवार, विद्यार्थी, पालक आणि विविध सामाजिक स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पाणीप्रश्नी आमदारांवर गंभीर आरोप; “अमळनेरकरांची दिशाभूल करून पाणी अडविण्याचे राजकारण”

 

 

प्रतिनिधी | अमळनेर

अमळनेर शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पाणीपुरवठा सभापती श्री. कैलास पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत. शहराच्या पाणीपुरवठ्यात अडथळे निर्माण होण्यास आमदारच अप्रत्यक्षपणे जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पत्रकात म्हटले आहे की, जळोदच्या दिशेने येणारे पाणी अडविण्याचे काम स्वतः आमदारांकडूनच करण्यात आले. तापी नदीवरील वाळू ठेक्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अवैध खड्डे करण्यात आले असून त्यामुळे नदीपात्रातील पाणीसाठा अडविला गेला. तसेच वाळू वाहतुकीसाठी नदीपात्रात टाकण्यात आलेले रस्ते व बांध यामुळे अमळनेर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

तहसीलदारांनी नदीपात्रातील अवैध रस्ते हटविण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप पत्रकात करण्यात आला आहे. मात्र शिवसेनेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती व सत्ताधारी नगरसेवक यांनी प्रत्यक्ष पाहणी करून जेसीबीच्या सहाय्याने रस्ते व बांध हटविल्यानंतर डोहातील पाण्याची पातळी वाढली असून आता शहराला नियमित पाणीपुरवठा होईल, अशी ग्वाही देण्यात आली आहे.

“पाण्याचे राजकारण करू नये,” असा सल्ला देत सभापती कैलास पाटील यांनी आमदारांवर निशाणा साधला. सत्ता गेल्यानंतरच पाणीपट्टीबाबत कळवळा निर्माण झाला असून पाणीपट्टी ९०० रुपयांवरून १८०० रुपये करताना जनतेचा विचार केला होता का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नगराध्यक्षपदाच्या काळात भर पावसाळ्यात नगरपरिषदेसमोर हंडा मोर्चा निघाल्याची आठवण करून देत त्यांनी आमदारांवर टीका केली.

२४x७ पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव आपणच शासनाकडे पाठविला होता, तसेच त्याकाळात स्वखर्चाने नदीपात्रात १४ बोअरवेल करण्यात आल्या व कलाली डोहातून ८.५० कोटी रुपयांची तातडीची योजना मंजूर करून नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्या वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल होत असल्याचे सांगत भविष्यात सोलर यंत्रणा कार्यान्वित करण्याचा मानस असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन २४x७ पाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच अमळनेरकरांना या योजनेचा लाभ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

“आमचे शब्द हे केवळ आश्वासन नसून वचन आहे,” असे सांगत अमळनेरकर जनतेने दिलेला कौल सार्थ ठरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे पाणीपुरवठा सभापती श्री. कैलास पाटील यांनी पत्रकाच्या शेवटी म्हटले आहे.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा १० वा वर्धापन दिन उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गौरव विविध शासकीय सेवांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार; ‘प्रमोशन’ पुस्तकाचे प्रकाशन

प्रतिनिधी | अमळनेर

अमळनेर येथील *पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय* संचलित *पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा* १० वा वर्धापन दिन शुक्रवार, ८ मे रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या केंद्राने गेल्या दशकभरात अनेक विद्यार्थ्यांना यशाची दिशा दिली असून, कार्यक्रमात विविध क्षेत्रांत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेचे निवृत्त प्रशासन अधिकारी *भाऊसाहेब देशमुख* उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमळनेरचे पोलीस निरीक्षक *दत्तात्रय निकम* यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमधील संधी, मेहनत, शिस्त आणि सातत्य यांचे महत्त्व पटवून देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. मंचावर ग्रंथालयाचे सचिव *प्रकाश वाघ*, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक *संदीप पाटील*, निवृत्त गटशिक्षणाधिकारी *अशोक बिऱ्हाडे*, पत्रकार तथा संचालक *ईश्वर महाजन*, संचालक *दीपक वाल्हे* आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विविध शासकीय सेवांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. *जळगाव पोलीस दलात* निवड झालेल्या *ज्ञानेश्वर पाटील*, *मीराभाईंदर पोलीस दलात* निवड झालेल्या *कु. गीतांजली नितीन पाटील*, *ठाणे शहर पोलीस दलात* निवड झालेले *कल्पेश संजय पाटील* तसेच *टी.ए. आर्मीमध्ये* निवड झालेल्या *भूषण हरिश्चंद्र पाटील* यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच केंद्राचे माजी विद्यार्थी *ॲड. मंगेश पाटील*, *इंडियन नेव्हीतील मयूर लोहार* आणि *आयटीबीपीमध्ये कार्यरत महेंद्र नेरकर* यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

वर्धापन दिनानिमित्त आयोजित *वकृत्व स्पर्धा* आणि *सामान्य ज्ञान स्पर्धेला* विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यासोबतच स्पर्धा परीक्षा चळवळीला सहकार्य करणाऱ्या *पातोंडा परिसर विकास मंच*, *राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी पुणे*, *निवृत्त आर्मी ग्रुप अमळनेर* तसेच विविध मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक *संदीप पाटील* लिखित *‘प्रमोशन’* या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेवक *राजूदादा फाफोरेकर*, संचालक *बापू नागावकर*, तलाठी *एम. आर. पाटील* तसेच कवी व पत्रकार *अजय भामरे* यांच्या दातृत्वातून स्पर्धांतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. सचिव *प्रकाश वाघ* यांच्या सहकार्याने सर्व विद्यार्थ्यांसाठी नाश्ता व चहाची व्यवस्था करण्यात आली होती.

स्पर्धांचे परीक्षक म्हणून *संदीप पाटील, गिरीश पाटील, उज्वल मार्कंडेय, किशोर पाटील, गोकुळ बोरसे, गजानन पाटील* आणि *महालपुरे सर* यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष *दिलीप सोनवणे*, सचिव *प्रकाश वाघ*, *दीपक वाल्हे*, *बापू नागावकर*, *सुमित धाडकर* आणि संचालक मंडळाने विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन *प्रिया परदेशी* व *कुशल भदाणे* यांनी केले. प्रास्ताविक *संदीप पाटील* यांनी तर आभार प्रदर्शन केंद्र संचालक *विजयसिंह पवार* यांनी केले.

अमळनेरकरांचे पाणी संकट तूर्तास टळले ; नगरपरिषदेचे ५० लाखांचे आवर्तन खर्चातून बचत नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या नियोजनाला यश ; तापी नदीतील पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरळीत

अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहराला जळोद–कलाली योजनेद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा जलस्तर खालावल्याने शहरावर पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. मे महिन्याच्या तीव्र उन्हामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊन आवर्तनाची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच तापी नदीत पुन्हा पाणी उपलब्ध झाल्याने अमळनेरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांचा पाणीप्रश्न तूर्तास मार्गी लागला आहे.

लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या अभ्यासपूर्ण नियोजनामुळे नगरपरिषदेला आवर्तनासाठी खर्च करावे लागणारे तब्बल ४५ ते ५० लाख रुपये वाचल्याचे मत पाणीपुरवठा सभापती कैलासतात्या पाटील यांनी व्यक्त केले. पाणीटंचाईचे संभाव्य संकट ओळखून प्रशासनाने वेळेवर हालचाली केल्याने शहरावर मोठे आर्थिक ओझे येण्यापासून बचाव झाला आहे.

दरम्यान, काल रात्रीपासून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर अनवर्डे परिसरात काहींनी अवैध बंधारा व रस्ता तयार केल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळित झाला होता. ही गंभीर बाब समोर येताच नगराध्यक्ष डॉ. बाविस्कर यांनी तातडीने उपाध्यक्ष प्रशांत निकम यांना तहसीलदार चोपडा, मंडळ अधिकारी तसेच संबंधित प्रशासनाशी संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या.

प्रशासनाने तात्काळ कारवाई करत अवैध रस्ता व बंधारा हटवून पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरळीत केला. त्यामुळे नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आज दि. ७ मे २०२६ रोजी भर उन्हात उपाध्यक्ष, सभापती तसेच दोन्ही गटांतील नगरसेवकांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. अनवर्डे नदी पात्रात स्वतः उपस्थित राहून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याने प्रशासनाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

याचबरोबर नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी तापी नदीच्या जळोद पात्रात पाण्याची साठवण करण्यासाठी तात्पुरता बंधारा उभारण्याच्या सूचनाही दिल्या असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे मे महिन्यासारख्या कठीण कालावधीत जळोद येथील दोन्ही पंप पूर्ण क्षमतेने सुरू असून कलाली डोह अद्याप सुरू करण्याची वेळ आलेली नसल्याने नगरपरिषदेच्या नियोजनाचे कौतुक केले जात आहे.

अमळनेर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नगरपरिषद यंत्रणा समन्वयाने कार्यरत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

देशातील पहिले ‘एआय मंदिर’ आता ‘व्हीआर दिव्यदर्शन’मुळे पुन्हा चर्चेत श्री मंगळग्रह मंदिरात डिजिटल युगाची नवी क्रांती; घरबसल्या मिळणार 360 अंशांचा दिव्य अनुभव आमदार अनिलदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; तंत्रज्ञानाधारित धार्मिक पर्यटनाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल

 

 

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर येथील प्रसिद्ध श्री मंगळग्रह मंदिराने पुन्हा एकदा देशाचे लक्ष वेधून घेत डिजिटल धार्मिक पर्यटनाच्या क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे मंदिराच्या संपूर्ण आभासी दिव्यदर्शनाची अनुभूती देणारी अत्याधुनिक व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर) यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, अशी सुविधा उपलब्ध करणारे श्री मंगळग्रह मंदिर हे देशातील पहिले आणि एकमेव मंदिर ठरले आहे.

बुधवार, दि. ६ मे रोजी आमदार अनिलदादा पाटील यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून या डिजिटल उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यापूर्वी मार्च महिन्यात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते मंदिरात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ‘एआय’ यंत्रणेचा शुभारंभ झाला होता. त्यामुळे देशातील पहिले एआय मंदिर म्हणूनही श्री मंगळग्रह मंदिराने वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आता नव्याने सुरू करण्यात आलेल्या व्हीआर तंत्रज्ञानामुळे जगभरातील भाविक, पर्यटक आणि श्रद्धाळूंना घरबसल्या मंदिराचा समग्र, जिवंत आणि 360 अंशांतील दिव्य अनुभव घेता येणार आहे. धार्मिक पर्यटन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम घडवून आणणारे हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

360 अंशांत मंदिराचा दिव्य फेरफटका

मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे विकसित करण्यात आलेल्या या अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून भाविकांना मंदिर परिसराचा संपूर्ण आभासी फेरफटका मारता येणार आहे. मंदिरातील विविध देवतांची स्थाने, पूजाविधींची ठिकाणे, गाभारा, सभामंडप आणि परिसर 360 अंशीय दृश्यांमधून पाहण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

विशेष म्हणजे, ही सुविधा वापरण्यासाठी कोणतेही स्वतंत्र ॲप डाउनलोड करण्याची आवश्यकता नसून मोबाईल किंवा संगणकावर थेट लिंकच्या माध्यमातून दिव्यदर्शन घेता येणार आहे. मंदिर परिसरात परस्परसंवादी स्पर्शपटल केंद्र देखील उभारण्यात आले असून, त्याद्वारे भाविकांना डिजिटल भ्रमंतीचा अनुभव घेता येणार आहे.

मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये ध्वनी मार्गदर्शन उपलब्ध असल्याने देश-विदेशातील पर्यटकांना मंदिराची माहिती सहज समजू शकणार आहे. मार्गदर्शित तसेच स्वयंसंचलित असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

वृद्ध, दिव्यांग आणि परदेशातील भाविकांसाठी वरदान

या डिजिटल सुविधेमुळे वृद्ध भाविक, दिव्यांग नागरिक तसेच परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीयांनाही मंदिराचा अनुभव घरबसल्या घेणे शक्य होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने धार्मिक स्थळांचा जागतिक स्तरावर प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अशा प्रकारचे व्यासपीठ प्रभावी ठरू शकते, असा विश्वास प्रकल्प विकसित करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

याशिवाय मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या, वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थापनाचे सुनियोजन करण्यासही या तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होणार असल्याचे सांगण्यात आले.

‘डिजिटल ट्विन’ तंत्रज्ञानाचा वापर

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘इम्पॅक्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या मुंबई, कोची आणि दिल्ली येथे कार्यालये असलेल्या तंत्रज्ञान कंपनीने विकसित केला आहे. डिजिटल ट्विन तंत्रज्ञान, जीआयएस नकाशांकन, कृत्रिम बुद्धिमत्ता विश्लेषण आणि अनुभवात्मक पर्यटन उपाययोजना या क्षेत्रात कार्यरत असलेल्या या कंपनीने ड्रोन फोटोग्रॅमेट्री, 360 अंशीय स्कॅनर आणि प्रगत त्रिमितीय रेंडरिंगच्या सहाय्याने मंदिराची सविस्तर डिजिटल प्रतिकृती तयार केली आहे.

या प्रकल्पाच्या कार्यसंघात चेन्नई येथील मिथुन आनंद, मुंबई येथील दीप्तीताई पाटील, वंश चिंदा आणि पुष्कर पुष्प यांचा मुख्यत्वे समावेश आहे.

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी डांगरीचे माजी सरपंच अनिल शिसोदे, कामगार नेते एल. टी. नाना पाटील, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, मंगल सेवेकरी विनोद कदम, प्रकाश मेखा, आशाताई महाले, ‘ग्लोबल महातेज’चे कार्यकारी संपादक भरत पाटील, ब्युरो चीफ रजनीकांत पाटील, आर्टिस्ट समीर सांगळे यांच्यासह सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तहानलेल्या मुक्या जीवांना आधार — बजरंग दलाचा पाणी कुंडे उपक्रम

 

अमळनेर (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या तीव्रतेत वाढ होत असताना शहरात फिरणाऱ्या मुक्या पशु व गोवंशांना पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण निर्माण होते. ही गरज ओळखून विश्व हिंदू परिषद बजरंग दल अमळनेर यांच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी सिमेंटचे पाण्याचे कुंडे बसवण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत अमळनेर शहरातील प्रमुख चौक, रस्ते व मोकळ्या जागांमध्ये पाण्याने भरलेली कुंडे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे उन्हामुळे त्रस्त असलेल्या जनावरांना सहज पिण्याचे पाणी उपलब्ध होत असून नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.

संघटनेचे कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन कुंड्यांमध्ये नियमित पाणी भरण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. तसेच नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी होऊन कुंड्यांमध्ये पाणी भरून मुक्या जीवांची तहान भागवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी जपत मानवतेचा संदेश दिला जात असून, शहरात एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिर भाविकांनी गजबजले देशभरातून भाविकांची उपस्थिती; दुर्मिळ योगामुळे पूजाअर्चेला विशेष महत्त्व

 

अमळनेर (प्रतिनिधी): अंगारक संकष्ट चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त मंगळवार, दि. ५ मे रोजी येथील श्री मंगळग्रह मंदिर भाविकांच्या प्रचंड गर्दीने गजबजून गेले. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतून हजारो भाविकांनी मंदिरात हजेरी लावून दर्शन व पूजाअर्चा केली. यंदाच्या २०२६ वर्षातील ही दुसरी अंगारकी चतुर्थी असून, दुर्मिळ योग जुळून आल्यामुळे या दिवसाचे धार्मिक महत्त्व अधिक वाढले होते.

हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष स्थान आहे. त्यातही चतुर्थी मंगळवारी आल्यास ती ‘अंगारकी चतुर्थी’ म्हणून ओळखली जाते. वैशाख वद्य चतुर्थीला आलेल्या या शुभ योगामुळे भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. अनेक भाविक सोमवार, दि. ४ मे रोजी रात्रीपासूनच मंदिरात दाखल झाले होते.

पहाटे ५.२५ वाजता चतुर्थीचा प्रारंभ होताच मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. पहाटेच्या शुभ मुहूर्तावर श्री गणपती बाप्पा, पंचमुखी हनुमान, तसेच श्री मंगळग्रह देवतेचे यजमानांच्या हस्ते विधिवत विशेष पूजन करण्यात आले. यानंतर भाविकांनी मंदिर परिसरातील भगवान श्री गुरुदत्त-श्री अनघालक्ष्मी माता, श्री कालभैरवनाथ-श्री माता भैरवी, श्री स्वामी समर्थ महाराज तसेच मंगळेश्वर महादेव यांचेही दर्शन घेतले.

ही चतुर्थी बुधवार, दि. ६ मे रोजी सकाळी ७.५१ वाजेपर्यंत असल्याने ‘अहोरात्र अंगारकी’चा योग जुळून आला होता. याशिवाय या दिवशी शिवयोग व बुधादित्य योगही असल्याने भाविकांसाठी हा दिवस अत्यंत फलदायी मानला गेला. रात्री सुमारे १०.३५ वाजता चंद्रोदय झाल्यानंतर अनेक भाविकांनी चंद्राला अर्घ्य अर्पण करून उपवास सोडला.

अंगारकी चतुर्थीचे महत्त्व

स्कंद पुराणानुसार अंगारक यांनी भगवान गणेशाची कठोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपती बाप्पांनी मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला ‘अंगारकी’ म्हणून ओळख दिली. या दिवशी व्रत केल्याने कर्जमुक्ती, आत्मविश्वास वाढ आणि अडथळ्यांवर मात होते, अशी श्रद्धा आहे. भक्तांनी २१ दुर्वा व मोदकांचा नैवेद्य अर्पण करून गणेशपूजन करावे आणि चंद्रोदयानंतर व्रत सोडावे, अशी परंपरा आहे.

यंदा तीन अंगारकी चतुर्थी

पंचांगानुसार २०२६ मध्ये एकूण तीन अंगारकी संकष्टी चतुर्थी आहेत. पहिली ६ जानेवारी रोजी झाली असून, दुसरी ५ मे रोजी साजरी करण्यात आली. तिसरी अंगारकी चतुर्थी २९ सप्टेंबर २०२६ रोजी येणार आहे. ग्रह-नक्षत्रांची विशेष स्थिती आणि मंगळवार व चतुर्थीचा योग यामुळे हा दुर्मिळ योग घडत असल्याचे जाणकार सांगतात.

test
casino utan svensk licens