ब्रेकिंग
अमळनेर-नाशिक बस वेळेवरून संताप; धुळे-मुंबई रेल्वे जोडणीची मागणी तीव्र प्रशासनाने तत्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा

 

प्रतिनिधी | अमळनेर

अमळनेर येथून पहाटे ५:१५ वाजता सुटणारी अमळनेर-नाशिक एसटी बस प्रवाशांच्या सोयीपेक्षा गैरसोयीची ठरत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. या बसची वेळ धुळे-मुंबई या महत्त्वाच्या रेल्वेशी न जुळल्यामुळे शेकडो प्रवाशांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, वेळेत बदल न झाल्यास अमळनेर बस स्थानकावर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा ॲड. सारांश धनंजय सोनार यांनी दिला आहे.

सध्या अमळनेरहून सकाळी ५:१५ वाजता सुटणारी बस अमळनेर रेल्वे स्थानकावर साधारण ६ ते ६:१० दरम्यान पोहोचते. याच सुमारास धुळ्याहून मुंबईकडे जाणारी रेल्वे सुटत असल्याने प्रवाशांची अक्षरशः धावपळ उडते. अनेक वेळा रेल्वे हुकत असल्याने व्यापारी, नोकरदार आणि सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.

बसची वेळ व मार्ग बदलण्याची मागणी करताना ॲड. सोनार यांनी स्पष्ट केले की, सदर बस पहाटे ५:१५ ऐवजी ४:४५ वाजता सोडण्यात यावी. तसेच बसने ‘बारापत्थर’ मार्ग टाळून थेट रेल्वे स्थानक गाठावे. या बदलामुळे प्रवाशांना वेळेत रेल्वे पकडता येईल आणि एसटी महामंडळालाही अधिक प्रवासी मिळून उत्पन्नात वाढ होईल.

दरम्यान, ही मागणी अनेक दिवसांपासून आगार प्रशासनाकडे प्रलंबित असून, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. या गंभीर प्रश्नात आमदार अनिल पाटील यांनी तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.

प्रवाशांच्या भावना व्यक्त करताना ॲड. सारांश धनंजय सोनार म्हणाले,

“अमळनेरच्या प्रवाशांसाठी धुळे-मुंबई रेल्वे ही अत्यंत सोयीची आहे. मात्र बसच्या चुकीच्या वेळेमुळे हा लाभ घेता येत नाही. प्रशासनाने तात्काळ वेळ व मार्गात बदल केला नाही, तर आम्ही प्रवाशांच्या हितासाठी अमळनेर बस स्थानकावर धरणे आंदोलन छेडू.”

आता या वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर आगार प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ओव्हर लोडेड रेती,खडीचे डंपर कॉलनी रस्त्यांना करते उध्वस्त महात्मा फुले कॉलनीचा रस्ता उदाहरण आहे दस्तूर खुद्द

 

प्रतिनिधी | अमळनेर 

                    येथील पिंपळे रोडवरील महात्मा फुले कॉलनीतील पूल ( ढापा) अवजड वाहनामुळे खचला आहे. पिंपळे नाल्यावरील कॉलनीकडे जाणारा रस्त्यालगतचा पूल तुटल्याने कॉलनीत येणाऱ्या जाणाऱ्यांची गैरसोय होत आहे. ढेकू रस्ता बंद असल्यामुळे, ढेकू रस्त्याने जाणारे अवजड वाहने पिंपळे रस्त्याने वापरत आहेत. या रस्त्यावरून ओव्हर लोडेड रेतीचे डंपर व खडीचे डंपर बिन दिक्कत सुसाट वाहत आहेत. त्यामुळे रस्ता मिळेल त्या बाजूने ही ओव्हर लोडेड डंपरांची रहदारी वाढलेली आहे. याचा फटका पिंपळे रोड वरील महात्मा फुले कॉलनीला बसला आहे. महात्मा फुले कॉलनीचा पूल मुळातच कमकुवत होता, आता त्यावरून अवजड वाहने जात असल्याने पुल ढासळला आहे.

            ओव्हर लोडेड रेतीच्या वाहनांवर ना महसूल विभागाचे ना पोलीस प्रशासनाचे लक्ष आहे.तरी प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन ओव्हर लोडेड वाहनांवर योग्य ती कारवाई करावी तसेच अमळनेर नगर परिषदेने त्वरित महात्मा फुले कॉलनीतील तुटलेल्या पुलाची दुरुस्ती करावी किंवा नव्याने बांधावा अशी जनतेतून मागणी होत आहे. कॉलनी परिसरातील लोकांशी संपर्क साधला असता, रहिवाशांनी त्वरित पूल बांधण्यात यावा अशी मागणी केली आहे. याबाबत कॉलनीतील रहिवाशी न.पाला निवेदन देणार आहेत. तरी निवेदनाची वाट न पाहता न.पाने नागरिकांच्या मूलभूत सुविधाची काळजी घेऊन पुलाचे काम त्वरित करावे.

रात्री–पहाटे धडक कारवाई : ट्रॅव्हल बसेसची जळगाव पोलिसांकडून अचानक तपासणी

 

जळगाव | प्रतिनिधी

जिल्ह्यातून रात्री व पहाटेच्या सुमारास धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसेसचा वापर करून गुटखा, हवाला रक्कम, गांजा, देसी कट्टा तसेच चोरीचे सामान यांची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी मोठी धडक कारवाई हाती घेतली आहे.

या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून आज रात्री व पहाटे अचानक तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून, महत्त्वाच्या चौकांमध्ये नाकाबंदी करून प्रत्येक ट्रॅव्हल बसची सखोल तपासणी केली जात आहे.

मुक्ताईनगर–बोदवड चौफुला, आकाशवाणी चौफुला तसेच भुसावळ परिसरात ही कारवाई तीव्र करण्यात आली आहे. यावेळी आरसीपी (रोड चेकिंग पथक) चा देखील प्रभावी वापर केला जात असून संशयित हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

तपासणीदरम्यान बसमधील प्रवाशांची चौकशी, संशयास्पद बॅगांची तपासणी तसेच बसेसच्या डिक्कीची झडती घेण्यात येत आहे. काही ठिकाणी खासगी बसचे कंडक्टर हे कुरियरप्रमाणे काम करून अवैध वस्तूंची देवाणघेवाण करत असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

पोलिसांच्या या अचानक कारवाईमुळे बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. पुढील काळातही अशा तपासण्या सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

🎓 जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा निकाल ९९% — यशाची परंपरा कायम!

 

अमळनेर येथील जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने मार्च २०२६ मध्ये झालेल्या एच.एस.सी. बोर्ड परीक्षेत तब्बल ९९ टक्के निकाल लावून पुन्हा एकदा आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण तालुक्यात विद्यालयाचे कौतुक होत आहे.

यावर्षी कला व विज्ञान शाखेतून एकूण ७४८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत संस्थेचा लौकिक उंचावला आहे.

👉 विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थी :

🔹 सार्थक रितेश मगर — ९०% (प्रथम)

🔹 अनुष्का सोपान पाटील — ८९% (द्वितीय)

🔹 देवयानी चंद्रकांत पाटील — ८८.८३% (तृतीय)

 

👉 कला शाखेतील गुणवंत विद्यार्थी :

🔹 निराली पोपट गव्हाणे* — ८६.८३% (प्रथम)

🔹 उजैफ खान फारुख खान पठाण* — ८१.३३% (द्वितीय)

🔹 जिया कुवरसिंग तेली* — ८०.८३% (तृतीय)

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डी. डी. पाटील, उपाध्यक्ष रावसाहेब के. डी. पाटील, खजिनदार शैलेन्द्र दत्तात्रेय पाटील, संचालक नंदकुमार डी. पाटील, संचालिका डॉ. नयना कैलास पाटील तसेच सर्व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब के. डी. पाटील, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. पी. डी. पाटील आणि कला व विज्ञान शाखेतील सर्व शिक्षकांच्या कुशल मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

“सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्तबद्ध शिक्षण आणि गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन यामुळेच हा दैदिप्यमान निकाल शक्य झाला,” असे मत संस्थेकडून व्यक्त करण्यात आले.

प्रताप महाविद्यालयाचे उज्वल यशाची परंपरा राखली कायम 

 

अमळनेर दि. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागातर्फे घेण्यात आलेल्या एच एस सी मार्च 20 26 परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे उज्वल यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले.

         विज्ञान शाखेतून 467 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते त्यापैकी 466 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाखेचा निकाल ९९.७८ टक्के लागला. कला शाखेचे 62 पैकी 62 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल लागला. वाणिज्य शाखेत 158 पैकी 154 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 97.46 % लागला आहे. किमान कौशल्य शाखेत 19 पैकी 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व निकाल 63.15 टक्के लागला. एकूण चारही शाखांचा मिळून महाविद्यालयाचा निकाल 99.8 टक्के लागला आहे.

               या घवघवीत यशाबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे खा. शी. मंडळाचे चेअरमन नीरज अग्रवाल, व्हा. चेअरमन जितेंद्र जैन, संस्थेचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, उपाध्यक्ष कमल कोचर, माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, संचालक पंकज मुंदडे, प्रदीप अग्रवाल, हरी वाणी, योगेश मुंदडे, सौ. लीना पाटील, डॉ. संदेश गुजराती, चिटणीस प्रा. पराग पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव यांनी अभिनंदन केले.

        सहचिटणीस प्रा. डॉ. व्ही. बी. माटे, मुख्याध्यापक प्रतिनिधी विनोद कदम, महाविद्यालयीन प्राध्यापक प्रतिनिधी प्रा. डी. व्ही. भलाकार, शिक्षक प्रतिनिधी राहुल पाटील, उप प्राचार्य प्रा. अमृत अग्रवाल, पर्यवेक्षक प्रा. सूर्यवंशी, प्रा. शालिनी पवार, तसेच परीक्षा समिती सदस्य प्रा. भानुदास गुलाले, प्रा. सुनील पाटील, प्रा. कमलाकर पाटील, नितीन बाविस्कर, संदेश शर्मा व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

बोरी नदी पात्रात प्लास्टिक मुक्त अभियान; यात्रोत्सवात पर्यावरण जनजागृतीचा प्रभावी संदेश

 

अमळनेर (दि. ०३ मे २०२६, रविवार) – श्री संत सद्गुरु सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आज सकाळी ६ वाजता बोरी नदी पात्रात भव्य प्लास्टिक मुक्त अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात विविध महाविद्यालयांच्या स्वयंसेवकांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नदी परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा साचलेला आढळून आला. शीतपेयांच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, गुटखा रॅपर्स, सौंदर्यप्रसाधनांचे प्लास्टिक आवरण, खेळण्यांचे तुकडे आदी विविध प्रकारचा कचरा गोळा करण्यात आला. अवघ्या एका तासात तब्बल तीन घंटागाड्या भरतील इतका प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला, यावरून प्लास्टिक वापराचे भीषण चित्र स्पष्ट झाले.

यावेळी आयोजकांनी इशारा दिला की, अशाच प्रकारे प्लास्टिकचा बेफाम वापर सुरू राहिल्यास भविष्यात पर्यावरणीय संतुलन बिघडण्यासोबतच गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. नदी प्रदूषण, जमिनीची नापीकता तसेच कॅन्सरसारख्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

“सिंगल-यूज प्लास्टिकचा वापर टाळा आणि नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या डस्टबिनमध्येच कचरा टाका,” असा संदेश देत नागरिकांना जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. यात्रोत्सवांसारख्या मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकचा वापर टाळणे अत्यावश्यक असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.

या उपक्रमासाठी विद्यापीठाचे संचालक डॉ. व्ही. एम. रोकडे, नवनियुक्त संचालक डॉ. प्रवीण महाले, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा येथील प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, प्रताप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एच. डी. जाधव, प्रा. डॉ. पराग पाटील, डॉ. मांटे, उपप्राचार्य अमृत अग्रवाल यांच्यासह विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

तसेच महिला योगा ग्रुप, अमळनेर महिला मंच, विविध महाविद्यालयांचे NSS स्वयंसेवक, प्रताप तत्त्वज्ञान केंद्राचे सदस्य आणि अमळनेर नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी यांनीही मेहनत घेतली.

या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, श्री संत सद्गुरु सखाराम महाराजांनीही या अभियानाचे अभिनंदन करत पर्यावरण रक्षणासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.

डी.आर. कन्या शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

 

अमळनेर : खा.शि.मं. संचलित दौ.रा. कन्या शाळेत १ मे महाराष्ट्र दिन अत्यंत उत्साहपूर्ण व देशभक्तीच्या वातावरणात मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात शालेय प्रार्थना व प्रतिज्ञेने झाली. त्यानंतर ध्वजारोहन समारंभ पार पडला. राज्यगीत व राष्ट्रगीत विद्यार्थिनींनी तालासुरात सादर करून परिसर देशभक्तीमय झाला. मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सुर्यवंशी मॅडम यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी ध्वजाला मानवंदना देत सलामी दिली.

यावेळी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आढवले मॅडम, शाळेचे पर्यवेक्षक श्री एस. पी. वाघ, ज्येष्ठ शिक्षक एस. एस. माळी, एस. एस. वाघ, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस. आर. सोनवणे, ज्येष्ठ लिपिक श्री शामभाऊ पवार, श्री के. आर. बाविस्कर, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी तसेच श्रीमती देवरे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर विद्यार्थिनींनी महाराष्ट्राच्या गौरवगाथा सांगणारी देशभक्तीपर गीते सादर केली. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका सौ. सुर्यवंशी मॅडम यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व विद्यार्थिनींना पटवून देत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

अमळनेरात महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य सोहळा : आदर्श शिक्षकांचा गौरव, दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

 

अमळनेर : महाराष्ट्र दिवस निमित्त पंचायत समिती शिक्षण विभाग, अमळनेर यांच्या वतीने आयोजित शासकीय कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. जिल्हा परिषद जळगाव संचलित या उपक्रमात आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणासह दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन जी. एस. हायस्कूल हॉल येथे करण्यात आले होते. या सोहळ्यास माजी मंत्री आमदार दादासाहेब अनिल पाटील, जळगाव लोकसभा खासदार ताईसाहेब स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. मंचावर मुख्याध्यापक प्रतिनिधी बाळासाहेब विनोद कदम, गट शिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, केंद्रप्रमुख चंद्रकांत पाटील (अमळगाव), रविंद्र पाटील (चिमणपुरी), अशोक सोनवणे (शहापूर) तसेच तालुका क्रीडा अध्यक्ष एस. पी. वाघ यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन व महाराष्ट्र गीताने झाली. प्रस्तावना गट शिक्षणाधिकारी प्रमोद पाटील यांनी मांडली.

यावेळी सन २०२५-२६ या वर्षासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कारप्राप्त शिक्षकांना सन्मानचिन्ह, शाल, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. याशिवाय राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला.

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मान्यवर :

श्रीमती मनिषा पाटील (जि.प. शाळा सडावण), सौ. सीमा सूर्यवंशी (डी. आर. कन्या शाळा), श्रीमती अनिता बोरसे (साने गुरुजी कन्या), श्री भैय्यासाहेब सालुंखे (जि.प. गडखांब), श्रीमती रोहिणी बडगुजर (जि.प. शाळा मुडी), श्रीमती सुवर्णा वाणी (जि.प. शाळा मेहरगाव), श्री प्रभाकर पाटील (जि.प. शाळा चिमणपुरी), श्री अनिल चौधरी (माध्यमिक विद्यालय निम), श्री बापूराव सांगोरे (माध्यमिक आश्रम शाळा रणाईचे), श्री आनंदा धनगर (माध्यमिक शाळा करणखेडा), श्रीमती शोभा कसबे (डी. आर. कन्या शाळा).

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंचायत समिती शिक्षण विभागासह सम शिंगाणे, कमलेश मोरे, सुनील करंदीकर, सचिन वाघ, भूपेंद्र सर यांनी विशेष सहकार्य केले.

हा सोहळा शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करतानाच विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करणारा ठरला.

अर्वाचीन भारताची ओळख म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध –प्रा.डॉ. राहुल निकम 

 

वाघोदा ता. अमळनेर : तथागत भगवान गौतम बुद्ध प्राचीन भारताची ओळख असून अर्वाचीन भारताची ओळख डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या जगाला मिळालेले वरदान आहे. तथागतांनी दिलेला धम्म आणि धम्माची शिकवण सर्वांकरिता कल्याणदायी आहे. तथागतांच्या धम्माच्या अनुसरणाने मानवी जीवनाचे उत्थान होऊन त्याला सर्व सुख प्राप्त होतात. प्रज्ञा, शील, करुणा हे धम्माचे प्रमुख आधारस्तंभ असून अनंत मैत्री, अनंत मुदिता, अनंत उपेक्षा आणि अनंत करुणा या धम्माच्या चार भिंती आहेत. पंचशिलाचे तथा अष्टांग मार्गाचे पालन केल्याने मानवाचे कल्याण होते तो स्वतः सुखी होतो आणि इतरांना देखील सुखी करतो असे प्रतिपादन समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथील प्रा.डॉ. राहुल निकम यांनी केले. ते अमळनेर तालुक्यातील वाघोदा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती स्थापन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावातून भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्त्यांची पुष्प वर्षाव करून रॅली काढण्यात आली. त्यानंतर भंते नागसेन यांनी बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमाचे आयोजन विनोद सैंदाणे, श्याम घोलप तसेच गावकऱ्यांच्या सहकार्याने केले होते.

          या प्रसंगी धम्म भंते नागसेन, भंते आनंद, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी अशोक बिराडे, सामाजिक कार्यकर्ते गौतम मोरे, प्रा. भगवान भालेराव, हृदयनाथ मोरे, एम एस बैसाणे, अतुल डोळस, प्रवीण बैसाणे, कृष्णकांत शिरसाठ, भालचंद्र सनर आदी मान्यवर उपस्थित होते.

🚆 अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ–जळगावमध्ये जल्लोषात शुभारंभ

 

जळगाव, दि. 29 एप्रिल (जिमाका): देशातील रेल्वे प्रवास अधिक सुलभ, जलद आणि आधुनिक करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत पंतप्रधान Narendra Modi यांनी 28 एप्रिल 2026 रोजी ‘अमृत भारत एक्सप्रेस’ गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. बनारस–पुणे (हडपसर) आणि अयोध्या–मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) या दोन महत्त्वाच्या मार्गांवर धावणाऱ्या या गाड्यांचे भुसावळ विभागात 29 एप्रिल रोजी उत्साहात स्वागत करण्यात आले.

भुसावळ रेल्वे स्थानकावर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तर जळगाव स्थानकावर खासदार स्मिता उदय वाघ, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर तसेच रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

या कार्यक्रमांना लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य, पत्रकार, स्थानिक नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यानिमित्ताने स्थानिक शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

नवीन ‘अमृत भारत एक्सप्रेस’ सेवा भुसावळ विभागातील प्रवाशांसाठी मोठी दिलासा देणारी ठरणार आहे. या गाड्या खंडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड आणि नाशिक रोड यांसारख्या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहेत. बनारस–हडपसर ही गाडी दररोज धावणार असून अयोध्या–लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी आठवड्यातून एकदा सेवा देणार आहे.

मध्यप्रदेशमार्गे धावणाऱ्या या गाड्यांमुळे प्रवाशांना थेट, जलद आणि अधिक आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेषतः धार्मिक पर्यटन, स्थलांतरित कामगार आणि महाराष्ट्र–उत्तरप्रदेश दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे.

थेट रेल्वे संपर्कामुळे गाड्या बदलण्याची गरज कमी होऊन वेळेची बचत होणार असून प्रवास अधिक सुरक्षित व सोयीस्कर होणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.

test
casino utan svensk licens