ब्रेकिंग
 संत सखाराम महाराज यात्रोत्सवात ‘प्लास्टिक मुक्त’ अभियानाची भव्य मोहीम

 

अमळनेर (प्रतिनिधी) : श्री संत सदगुरू सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त अमळनेर शहरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कक्षाच्या वतीने *रविवार, दि. ०३ मे २०२६ रोजी सकाळी ०६ वाजता* बोरी नदी पात्रात **‘प्लास्टिक मुक्त अभियान’** आयोजित करण्यात आले आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन हा उपक्रम सकाळच्या वेळेत हाती घेण्यात येणार आहे.

यात्रोत्सव काळात सिंगल-यूज प्लास्टिक कॅरी बॅग, कुल्फी-आईस्क्रीमचे रॅपर्स तसेच सौंदर्यप्रसाधनांच्या प्लास्टिक पॅकेजिंगचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने बोरी नदी परिसरात प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढते. यामुळे पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी हा स्वच्छता उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या अभियानासाठी विद्यापीठाचे संचालक डॉ. व्ही. एम. रोकडे, नवनियुक्त संचालक डॉ. प्रवीण महाले, जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. राजू गवारे, धुळे जिल्हा समन्वयक डॉ. निलेश पाटील, नंदुरबार जिल्हा समन्वयक डॉ. विशाल करपे यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, NSS कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

तसेच अमळनेर नगर परिषदेचे कर्मचारी, प्रताप तत्त्वज्ञान केंद्राचे कार्यकर्ते, विविध महाविद्यालयांतील NSS स्वयंसेवक, तसेच योगा ग्रुप अमळनेरच्या महिला भगिनींचाही सक्रिय सहभाग या मोहिमेत राहणार आहे.

या उपक्रमाद्वारे बोरी नदी पात्र स्वच्छ करून यात्रेकरूंना स्वच्छ व सुंदर वातावरणात यात्रोत्सवाचा आनंद घेता यावा, तसेच पर्यावरणाबद्दल जनजागृती व्हावी, हा मुख्य उद्देश आहे.

या अभियानाचे समन्वयक व विद्यापीठाच्या NSS सल्लागार समितीचे सदस्य, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळाचे प्रा. डॉ. मनीष करंजे यांनी निसर्गप्रेमी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, *“निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची हीच खरी वेळ आहे. चला, आपण सर्व मिळून बोरी नदी स्वच्छ करूया आणि प्लास्टिकमुक्त यात्रोत्सव साकार करूया.”

या स्तुत्य उपक्रमात सहभागी होऊन स्वच्छता अभियानाला हातभार लावा आणि पर्यावरण रक्षणासाठी आपली जबाबदारी पार पाडा.

 

प्रताप महाविद्यालयात भव्य बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

अमळनेर (प्रतिनिधी) – खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात भगवान महावीर, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेच्या बक्षीस वितरण समारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. करिअर कौन्सिलिंग सेंटर, आई जिजाऊ अभ्यासिका व युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत तब्बल १६२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

१४ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट ज्ञानाची चमक दाखवत स्पर्धात्मक वृत्तीचे दर्शन घडवले. स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे :

प्रथम क्रमांक नेरकर घनश्याम सुखदेव (८६ गुण) यांनी पटकावत रु. १०००, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्राप्त केले. द्वितीय क्रमांक चौधरी आकाश शांताराम (८५ गुण) यांनी मिळवला. तृतीय क्रमांकावर भोई दिपक गणेश, पाटील रुपेश सुरेश आणि भावसार अभिषेक विलास (प्रत्येकी ८३ गुण) हे संयुक्त विजेते ठरले.

उत्तेजनार्थ पारितोषिकांमध्ये चौधरी निळीश प्रल्हाद, पाटील पूजा अनिल व कुंभार उमेश संजय (प्रत्येकी ८१ गुण) यांचा समावेश होता.

विजेत्यांना संस्थेचे चिटणीस प्रा. पराग पाटील, प्र. प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, आई जिजाऊ अभ्यासिकेचे संचालक विशाल पांचाळ, तसेच डॉ. धनंजय चौधरी, डॉ. संदीप नेरकर, डॉ. आर. सी. सरवदे, डॉ. निलेश पवार, डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

समारंभास ग्रंथपाल दिपक पाटील, डॉ. किरण भागवत, डॉ. विलास गावित, डॉ. बालाजी कांबळे, नितीन राजपूत, प्रा. दिलीप तडवी, डॉ. हर्ष नेतकर, प्रा. हिमांशू गोसावी, पराग रवींद्र पाटील, तसेच आई जिजाऊ अभ्यासिकेचे विद्यार्थी शशिकांत परदेशी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीपदादा शिरसाठ, प्रा. हिमांशू गोसावी, पराग पाटील व आफ्रिन पठाण यांनी विशेष सहकार्य केले. समारंभाचे सूत्रसंचालन करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ. विजय तुंटे यांनी केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञानाविषयीची आवड वाढीस लागून स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

तहसीलदारांच्या नावाने मागितली लाच रंगेहात दोघे जेरबंद

 

अमळनेर :- तालुक्यात तहसीलदारांच्या नावाने पन्नास हजार रुपये लाचेची मागणी करून 25 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक 28 एप्रिल रोजी दुपारी रंगेहात पकडले. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा गौण खनिज ( वाळू ) वाहतुकीचा व्यवसाय असून, मौजे मांडळ येथील पांझरा नदीतून दोन ट्रॅक्टर द्वारे वाळू वाहतूक करण्यासाठी आरोपी रामराव हरचंद पाटील( वय 64, रा. लोन पंचम, ता. अमळनेर) व जितेंद्र राजेंद्र पाटील( वय 26 रा. झाडी, पोस्ट शिरसाळे, ता. अमळनेर) यांनी अमळनेर तहसीलदारांच्या नावाने प्रत्येक ट्रॅक्टर मागे पंचवीस हजार रुपये अशी एकूण 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

   याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांच्याशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. सापळा कारवाईदरम्यान आरोपींनी लाचेची मागणी कायम ठेवली त्यापैकी 25 हजार जितेंद्र पाटील यांनी पंचा समक्ष स्वीकारले. त्यावेळी पथकाने त्यांना रंग हात पकडले. याप्रकरणी आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 च्या कलम 7 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल यांच्या नेतृत्वात पार पडली. पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे करीत आहेत.

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील “माझं गाव–आरोग्य संपन्न गाव” अभियानाला जनआंदोलनाचे रूप द्या; उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घ्यावी विशेष काळजी

 

जळगाव, दि. 27 एप्रिल (जिमाका) — “माझं गाव–आरोग्य संपन्न गाव” हे अभियान केवळ पुरस्कारापुरते मर्यादित नसून प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्याची मोठी संधी आहे. जळगाव जिल्ह्याने या अभियानात राज्यात अव्वल स्थान मिळवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. राज्यात 1 एप्रिल 2026 पासून सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी अभियानाचा मुख्य उद्देश प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण व सहज आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करणे, तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करणे हे यामागील प्रमुख ध्येय असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना “आरोग्य संपन्न ग्राम” पुरस्कार देऊन सकारात्मक स्पर्धेला चालना दिली जाणार आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढे निर्देश देताना सांगितले की, आरोग्य सेवा प्रत्येक नागरिकाच्या दारापर्यंत पोहोचली पाहिजे. ग्रामपंचायत, महिला बचत गट, युवक मंडळे आणि स्थानिक संस्थांच्या सक्रिय सहभागातून हे अभियान जनआंदोलनात रूपांतरित करणे आवश्यक आहे. माता-बाल आरोग्य, लसीकरण, पोषण आणि स्वच्छता यांसारख्या घटकांवर कोणतीही तडजोड न करता विशेष भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच शुद्ध पिण्याचे पाणी, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनावर ठोस काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

🔥 उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा

जिल्ह्यात तापमान 44 अंशांपर्यंत पोहोचल्याने उष्माघात (हीट स्ट्रोक) व डिहायड्रेशन टाळण्यासाठी आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. गावोगावी दवंडी देऊन जनजागृती करण्याचे निर्देश देताना त्यांनी नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि डोक्याचे संरक्षण करावे, असे आवाहन केले. शेतकरी बांधवांनी शेतीची कामे सकाळी व सायंकाळीच करावीत, अशी सूचनाही त्यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, या अभियानाच्या यशासाठी लोकप्रतिनिधी आणि लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आरोग्य सेवा अधिक गतिमान करून ती प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.

सरपंच प्रतिनिधी म्हणून सुरेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त करत ग्रामस्तरावर अभियान राबविण्याच्या अनुभवांची माहिती दिली.

या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. स्वप्निल सांगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) भाऊसाहेब अकलादे, महिला व बालकल्याण अधिकारी हेमंतराव भदाणे यांच्यासह सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी अभियानाची सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन भूषण क्षत्रिय यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. रमेश धापते यांनी केले.

जिल्ह्याच्या सर्वांगीण आरोग्य उन्नतीसाठी राबविण्यात येणारे हे अभियान प्रभावीपणे राबल्यास जळगाव “आरोग्य संपन्न” जिल्हा म्हणून राज्यात आदर्श ठरणार, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

“महा आरोग्य शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा” — जिल्हाधिकारी रोहन घुगे मुख्यमंत्री सहायता निधीच्या महा आरोग्य शिबिरासाठी नियोजन बैठक संपन्न

 

जळगाव, दि. 28 (जिमाका) — शहरात आयोजित करण्यात येणारे महा आरोग्य शिबिर हे केवळ शहरापुरते मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, तसेच सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयातून कार्य करावे, असे आवाहन रोहन घुगे यांनी केले.

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महा आरोग्य शिबिराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन व सामंजस्य कराराबाबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी दीपमाला काळे, सुरेश भोळे, तसेच निवासी जिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीस मुख्यमंत्री सहायता निधी संलग्नित रुग्णालयांचे प्रतिनिधी, धर्मदाय रुग्णालये, शासकीय वैद्यकीय, आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालयांचे अधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, दानशूर व्यक्ती आणि आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात राज्य समन्वयक डॉ. रितेश पाटील यांनी मागील वर्षभरातील कार्याचा सविस्तर आढावा सादर केला. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच यापूर्वी आयोजित महा आरोग्य शिबिरांच्या यशस्वी अंमलबजावणीचा अनुभवही त्यांनी मांडला.

आमदार सुरेश भोळे यांनी हा उपक्रम शासकीय असला तरी सर्वांनी एकत्रितपणे टीमवर्कच्या माध्यमातून राबविणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. महापौर दीपमाला काळे यांनी महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक सर्व संसाधने आणि पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सिद्धार्थ चौधरी यांनी केले.

जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी ठरणाऱ्या महा आरोग्य शिबिरामुळे आरोग्य सेवांचा लाभ अधिक व्यापक पातळीवर पोहोचणार असल्याचे चित्र आहे.

एन.एम.एम.एस. परीक्षेत डी.आर. कन्या शाळेचा झळाळता यशस्वी ठसा

 

अमळनेर : येथील खा. शि. मं. संचलित द्रौ. रा. कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय स्तरावरील मानाच्या एन.एम.एम.एस. (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा लौकिक उंचावला आहे. या परीक्षेत तब्बल सहा विद्यार्थिनींनी विशेष प्राविण्यासह गुणवत्ता (मेरिट) यादीत स्थान मिळवले असून त्यांच्या या घवघवीत यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोक्षदा भूषण पाटील, मयुरी संदीप पाटील, ऐश्वर्या अजय पाटील, रोहिनी बाळू शिरसाठ, वैष्णवी महारू पाटील व केतकी पंकज देशपांडे या विद्यार्थिनींनी आपल्या मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर हे यश संपादन केले आहे.

या गुणवंत विद्यार्थिनींचा शाळेत विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी शालेय समितीचे चेअरमन भाऊसाहेब जितेंद्रजी जैन यांच्या हस्ते विद्यार्थिनींना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापिका श्रीमती एस. पी. बाविस्कर, पर्यवेक्षक श्री एस. पी. वाघ, ज्येष्ठ शिक्षक श्री एस. एस. माळी, श्री एस. एस. वाघ, ज्येष्ठ लिपिक श्री शाम पवार, श्री के. आर. बाविस्कर तसेच परीक्षेच्या प्रमुख श्रीमती तरन्नुम शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थिनींच्या यशाबद्दल कौतुक व्यक्त करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शाळेच्या या यशस्वी परंपरेमुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत असून भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी घडत राहील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

अमळनेर तालुक्यात शेतातील भीषण आगींचा कहर; ज्वारी पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

अमळनेर : तालुक्यात दुपारच्या सुमारास दोन वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या भीषण आगींमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. रांजणे आणि देवळी या गावांतील शेतांमध्ये लागलेल्या आगींनी ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पहिली घटना रांजणे येथे दुपारी सुमारे 12:35 वाजण्याच्या सुमारास घडली. प्रकाश धुडकू पाटील आणि सतीलाल नीलकंठ पाटील यांच्या शेतात अचानक आग भडकली. क्षणातच ज्वारीच्या पिकांनी पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वाढत्या तापमानामुळे किंवा इतर काही कारणांमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील रविंद्र पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित यंत्रणांना सतर्क केले.

दरम्यान, दुसरी घटना देवळी येथे दुपारी सुमारे 3:45 वाजता घडली. चांदणी कुरे आणि मनोज पाटील यांच्या ज्वारीच्या शेतात लागलेल्या आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. वाऱ्याच्या वेगामुळे आग झपाट्याने पसरत गेली आणि मोठ्या प्रमाणात पिके भस्मसात झाली.

दोन्ही घटनांमध्ये शेतकऱ्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी गणेश गोसावी यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी दाखल झाले. कर्मचारी फारुख शेख, जफर पठाण, दिनेश बिऱ्हाडे, मच्छिंद्र चौधरी, वासिम पठाण आणि आकाश बाविस्कर यांनी जीवाची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. त्यांच्या तत्पर आणि धाडसी कार्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

या आगींमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून नुकसानीचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अशा घटनांची शक्यता वाढत असल्याने शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तालुक्यात निर्माण झालेल्या या भीतीच्या वातावरणात भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.

साने गुरुजी विद्यालयाचा एन.एम.एम.एस. परीक्षेत नवा उच्चांक१६ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड; शाळेत जल्लोष, पेढे वाटप अमळनेर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने

 

अमळनेर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत (एन.एम.एम.एस.) परीक्षेत साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाने यंदा अभूतपूर्व यश संपादन करत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. शाळेच्या एकूण ७४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गुणवत्ता यादीत तब्बल १५ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे. याशिवाय साने गुरुजी कन्या हायस्कूलची एक विद्यार्थिनी देखील गुणवत्ता यादीत झळकली आहे.

गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोहित रमेश पाटील, शिवम मनोहर पाटील, विराज दीपक पाटील, गोपाल किशोर शिंदे, दीपांशू योगेश पाटील, पियुष अरुण शिंदे, शिवम देविदास पाटील, ललित सुनील ठाकरे, चाणक्य प्रशांत पाटील, मनन राकेश पाटील, नरेश चंद्रकांत महाजन, पुष्कर विनोद शिंदे, हर्षल प्रदीप सोनवणे, भार्गव महेंद्र पाटील आणि पूरब राजू खंगार यांचा समावेश आहे. तसेच संजना ज्ञानेश्वर अहिरे हिनेही गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेच्या यशात भर घातली.

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्ता नववी ते बारावीपर्यंत दरमहा १००० रुपये, अशा एकूण ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणात खंड पडू नये, हा या परीक्षेचा मुख्य उद्देश असून साने गुरुजी विद्यालयाने या उद्दिष्टाला साजेसे यश मिळवले आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सुनील पाटील आणि शिक्षक डी. ए. धनगर यांनी मार्गदर्शन केले. तांत्रिक सहाय्य मुस्ताक शेख व शुभम निकम यांनी दिले. कन्या हायस्कूलमधील विद्यार्थिनी संजना अहिरे हिला मुख्याध्यापिका अनिता बोरसे व शिक्षिका मनीषा वैद्य यांचे मार्गदर्शन लाभले, तर दीपक महाजन यांनी तांत्रिक सहकार्य केले.

या उल्लेखनीय यशानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सहसचिव ॲड. अशोक बाविस्कर, संचालक गुणवंत पाटील, भास्करराव बोरसे, किरण पाटील, मुख्याध्यापक प्रतिनिधी सुनील पाटील, शिक्षक प्रतिनिधी विलास चौधरी तसेच मुख्याध्यापिका अनिता बोरसे उपस्थित होते.

प्रास्ताविकात मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी परीक्षेचे उद्दिष्ट व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. आगामी स्पर्धा परीक्षांमध्येही असेच यश मिळवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ॲड. बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य हे यशामागील प्रमुख घटक असल्याचे सांगितले. विराज पाटील या विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त करत आपल्या अनुभवांची मांडणी केली.

अध्यक्षीय भाषणात संदीप घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याचा उपयोग शैक्षणिक प्रगतीसाठीच करावा, असे आवाहन करत या शिष्यवृत्तीचे महत्त्व अधोरेखित केले व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष उघडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डी. वाय. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

महात्मा फुले : आधुनिक भारताचे खरे शिल्पकार — प्रा. डॉ. लीलाधर पाटील

 

 अमळनेर : मानव मुक्तीचे तत्त्वज्ञान मांडणारे महात्मा फुले हे खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे निर्माते होते” असे प्रतिपादन डॉ लीलाधर पाटील यांनी केले महात्मा फुले जयंतीच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त युवा कल्याण प्रतिष्ठान संविधान जागर अभियान व मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित संयुक्त कार्यशाळेत ते बोलत होते प्रताप महाविद्यालयाच्या साने गुरुजी सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, प्रा. अशोक पवार आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.

महात्मा जोतीराव फुले यांनी भारतात अस्तित्वात असलेल्या जात वर्ग व लिंगभावावर आधारित शोषणाचे मूळ शोधून शोषणतंत्र आपल्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून उलगडून दाखवले. त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून मानव मुक्तीचे व शोषण विध्वंसनाचे तत्त्वज्ञान मांडले. यावर उपाय म्हणून एका सुसंवादी, चिकित्सक व विवेकावर आधारित शिक्षण शिक्षण पद्धतीचा पुरस्कार त्यांनी केला व अमलात देखील आणला. या देशातील शेतकऱ्यांच्या दुःखाला व शोषणाला वाचा फोडण्याचे काम तसेच पुरुषप्रधान जातीव्यवस्थेत शोषित असलेल्या महिलांना आवाज देणे हे ऐतिहासिक कार्य महात्मा फुले यांनी केले. ते केवळ तत्त्वज्ञान मांडून थांबले नाहीत तर आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी या या तत्त्वांवर जगून प्रत्यक्ष कृतीतून संपूर्ण शोषणमुक्तीचा कृती कार्यक्रम दिल. आपल्या डोक्यात तर्क विवेक आणि चिकित्सा आणि हृदयात करुणा दया आणि मानवता यासारख्या तत्त्वांना घेऊन आदर्शवत जीवन जगणारे फुले या नवीन पिढीला समजावून सांगितल्यास एका सुदृढ व विवेकाधीष्टीत समाजाची निर्मिती होऊ शकेल असे प्रतिपादन त्यांनी केले. महात्मा फुले यांच्या जीवनातील घटनांना जरी विशिष्ट स्थळ आणि वेळेची चौकट असली तरी त्यांनी निर्माण केलेल्या ज्ञानाला ही चौकट नाही आणि म्हणून त्यांच्या या द्विशताब्दी वर्षात या तत्त्वांचा प्रचार प्रसार करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे असे आव्हानही डॉ. पाटील यांनी केले.

युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा अशोक पवार यांनी सांगितले की, ” महात्मा ज्योतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्षात २०o व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्र, प्रदर्शन, पथनाट्य, परीक्षा, गीते इत्यादी कार्यक्रम जळगाव,धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात राबवून सुमारे 2 लाख नागरिक, विद्यार्थी,महिला, शेतकरी, कष्टकरी यांचे पर्यंत पोहोचण्याचा संकल्प सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करण्याचे जाहीर केले. सूत्रसंचालन डी ए पाटील यांनी केले तर दिशा संदा न शिव, भारती कोळी, श्रद्धा रे रा, निवेदिता कापडणेकर, उषा देवरे, बापूराव ठाकरे, दयाराम पाटील,अशोक बिऱ्हाडे, प्रा अशोक पवार यांनी महात्मा फुले यांच्यावरील गीताने कार्यक्रमाला सुरुवात केली. प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ हर्षवर्धन जाधव यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले कि आपण वर्षभर महात्मा फुले विषयी जे कार्यक्रम आयोजित कराल त्यात प्रताप कॉलेजचा सहभाग असेल, मदत व सहकार्य असेल, असे सांगून कार्यशाळेच्या आयोजकांचे अभिनंदन केले.

कार्यशाळेला पाचोरा कॉलेजचे माजी प्राचार्य बी एन पाटील, प्रा सुभाष पाटील, संदीप घोरपडे,सोमचंद सदा नशिव,डॉ भारती पाटील खलील देशमुख,वसुंधरा लांडगे, रामेश्वर भदाणे, योगेश पाटील, नगरसेविका योगिता पाटील, आरती पाटील,रियाज मौलाना, भीमराव महाजन,, प्रा डॉ संदीप नेरकर, प्रा डॉ नितीन पाटील, प्रा डॉ सरवदे,वाल्मीक मराठे, डी एम पाटील, ईश्वर महाजन, पुरुषोत्तम माळी, रामकृष्ण महाजन,प्रकाश महाजन,आशा महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संजय पाटील, हृदयनाथ मोरे, मिलिंद निकम बाबुराव ठाकरे,श्रद्धा रे रा,दिशा संदानशिव,निखिल रांजणकर, अशोक बिऱ्हाडे,,सोपान भवरे गोकुळ पाटील,,गुणवंत पवार आदींनी परिश्रम घेतले प्रा डॉ राहुल निकम यांनी आभार प्रदर्शन केले प्रताप महाविद्यालयाचे साने गुरुजी सभागृह खचून भरले होते खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याच्या भावना आयोजकांनी व्यक्त केल्या..

अमळनेरमध्ये स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत कचरा वेचकांसाठी भव्य कार्यशाळा संपन्न

अमळनेर (दि. २२ एप्रिल २०२६) — स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत, स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत क्षमता बांधणी घटकाच्या माध्यमातून अमळनेर नगर परिषदेतर्फे कचरा वेचकांसाठी एक व्यापक कार्यशाळा उत्साहात पार पडली. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) आणि अमळनेर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा उपक्रम इंदिरा गांधी भवन येथे दुपारी २ ते सायं. ५.३० या वेळेत आयोजित करण्यात आला.

या कार्यशाळेचे आयोजन मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे व नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाला शहरातील घंटा गाडी चालक, मदतनीस, घनकचरा प्रक्रिया केंद्रातील कर्मचारी व सुपरवायजर यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला.

प्रशिक्षणासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालयामार्फत नियुक्त कुशाग्र फाऊंडेशनच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यात नमस्ते योजना, NULM, ई-श्रम कार्ड, आधार नोंदणी, बचत गट स्थापन, घनकचऱ्यातील उद्योजकतेच्या संधी तसेच RRR केंद्र यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश होता.

या कार्यशाळेचा मुख्य उद्देश कचरा वेचकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे, त्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक प्रगतीस चालना देणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा होता. तसेच जागतिक पृथ्वी दिनाच्या निमित्ताने घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरणीय बदल याबाबत जनजागृती करण्यात येऊन उपस्थितांना हरित शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागींचा सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

या उपक्रमावेळी स्वच्छता निरीक्षक श्री. संतोष जाधव, श्री. किरण कंडारे, शहर समन्वयक श्री. गणेश गढरी, कुशाग्र फाऊंडेशनचे श्री. देवेंद्र केळोदे, श्री. मुकेश चव्हाण, श्री. प्रज्ज्वल शेवलकर तसेच युनुस शेख, अनंत संदानशिव, जया सरदार, घनकचरा सुपरवायजर श्री. खलील शहा व राजेंद्र गोलहीत आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वच्छतेकडून समृद्धीकडे, अमळनेरची ठाम वाटचाल!

test
casino utan svensk licens