मालकाने पगार दिला नाही, म्हणून कामगारांनी चक्क तिजोरीच उचलून नेली. सांगली जिल्ह्यातील्या विटामध्ये घडलेल्या या अजब चोरीप्रकरणी सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलंय. दोघा चोरट्यांना याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
सांगलीतील विटामध्ये सध्या एका अजब चोरीची चर्चा जोरात रंगलीय. 9 ऑक्टोबरला शिवाजी नगर इथं असलेल्या जिओ मार्ट ऑनलाईन सेंटरमध्ये चोरी झाली होती. या चोरीमुळे आजूबाजूच्या दुकानांमध्ये दहशत पसरली होती. तर संपूर्ण विटामध्ये खळबळ उडाली होती.
चोरट्यांनी जिओ मार्ट ऑनलाईन सेंटर दुकानाचं शटर फोटलं होतं. त्यानंतर सेंटरच्या आत प्रवेश करुन तब्बल 8 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. आश्चर्याची बाब म्हणजे चोरट्यांनी चक्क तिजोरीच उचलून नेत तब्बल 7 लाख 80 हजार रुपयांची रोकडही लंपास केली होती.
याप्रकरणी विटा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. विटा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम आणि पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकानं या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. या तपासादरम्यान, पोलिसांनी दोघा जणांना अटक केली. त्यांच्या तपासातून दोघेही आरोप 21 वर्षांचे असून ते बलवडी इथं राहणारे आहेत.