ठाणे : मविआची छत्रपती संभाजीनगर येथील सभा म्हणजे वज्रमुठ नसुन सत्तेसाठी हपापलेल्या खोट्या लोकांची वज्रझूठ सभा आहे. अशी खिल्ली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उडवली आहे. ठाण्यातील आनंद आश्रम येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी येत्या ९ एप्रिल रोजी शिवसेनेच्या सर्व आमदार – खासदारां सह अयोध्या दौर्यावर जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याआधी अयोध्या दौर्यात काही आमदारांना विमानातून उतरावं लागल्याने रामाचे दर्शन झाले नव्हते. तेव्हा, येत्या ९ एप्रिलला सर्व आमदार-खासदारांसमवेत अयोध्येला जाणार असल्याचे सांगितले.अयोध्या हा आमच्यासाठी भावनेचा, आस्थेचा विषय आहे, अयोध्येत भव्य राम मंदीर उभारले पाहिजे हे स्वप्न बाळासाहेबांचे होते ते पंतप्रधानांनी पुर्ण केले आहे.तेव्हा, खारीचा वाटा म्हणुन जशी धर्मवीर आनंद दिघे यांनी त्यावेळी चांदीची वीट पाठवली तशीच आम्हीदेखील आता महाराष्ट्रातुन सागाची लाकडे अयोध्येला पाठवल्याचे मुख्यमंत्रानी सांगितले. मविआच्या वज्रमुठ सभेबद्दल छेडले असता मुख्यमत्र्यांनी, संभाजीनगरमधील आजची सभा पाहून बाळासाहेबांना वेदना झाल्या असत्या. ही खोटी लोकं आहेत, सत्तेसाठी हपापलेली मंडळी आहेत. ज्या संभाजीनगरच्या नामकरणाला विरोध करीत होते त्याच संभाजीनगरमध्ये ही सभा होत आहे. हे दुर्दैवी असुन मविआची ही वज्रझुठ सभा असल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.