सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज पहाटेच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणीत एका बोलेरो वाहनातून 800 लीटर हातभट्टी दारू जप्त केली आहे. सोलापूर – विजयपूर महामार्गावरून हातभट्टी दारूची वाहतूक होणार असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला लागली होती. त्यानुसार पहाटेच्या सुमारास सापळा रचण्यात आला होता. मात्र, हातभट्टीची वाहतूक करणार वाहनचालक सूचना देऊन ही थांबत नव्हता, त्यामुळे पथकाने त्याचा सिनेस्टाईल पाठलग करून पकडले. या गाडीमध्ये हातभट्टी दारूने भरलेल्या 8 रबरी ट्यूब आढळून आल्या. वाहनातील दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल पवार आणि श्रीनाथ राठोड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.