सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील शेतकऱ्यांचा मुंबईच्या दिशेने बैलगाडी मोर्चा निघाला आहे. या मोर्चात शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा ही सहभाग आहे. सोलापूर जवळील सोनी कॉलेज जवळ रात्री शेतकऱ्यांनी मुक्काम केला. या बैलगाडी मोर्चात सुमारे 70 ते 80 शेतकरी सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यासाठी मंद्रूपचे शेतकरी मुंबईकडे दहा वाजता सोलापूर कडे रवाना होणार त्यानंतर ते मुंबईकडे आगे कूच करणार आहेत.
शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर असणारी एमआयडीसीची नोंद काढावी, शेतकऱ्यांची जमीन त्यांनाच राहू द्यावी अशा मागण्यांसाठी सुमारे 173 दिवस मंद्रूप येथील तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेऊन एमआयडीसी हा शेरा रद्द होईल असे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले होते.मात्र अद्याप सातबारा उताऱ्यावरील नोंद रद्द न झाल्याने ती रद्द होण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर शेतकरी आंदोलन करणार आहेत.त्यासाठी ते बैलगाडी द्वारे मुंबईकडे मार्गस्थ झाले आहेत.