November 22, 2024
महाराष्ट्र

खाता यंत्र कांदा उत्पादकांसाठी वरदान

गणेश चौधरी यांची निर्मीती

धुळे: शेतकऱ्यांचे श्रम कमी व्हावे या उद्देशाने धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील गणेश चौधरी यांनी स्वतः घरीच टाकाऊ वस्तूंचा वापर करून वाफा खाचे यंत्र तयार केले आहे. हे यंत्र सध्या शेतकऱ्यांमध्ये खूप चर्चेचा विषय ठरले आहे.

पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करायचे म्हटल्यास बहुतांश शेतकऱ्यांना ते शक्य होत नाही. हीच शेतकऱ्यांची गरज ओळखून शेतकऱ्यांचे श्रम कमी व्हावे या उद्देशाने धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील गणेश चौधरी यांनी टाकाऊ वस्तूंचा वापर करून वाफा खाचे यंत्र तयार केले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कांदा लागवडीचे काम सोपे व्हावे या उद्देशाने त्यांनी हे यंत्र तयार केले असून, या खाचा यंत्रामुळे कमी वेळेत कांद्याची लागवड अचूक तंत्रशुद्ध आणि एकसमान पद्धतीने होते.

या खाचा यंत्राने कांदा लागवड केल्यावर फवारणी किंवा खत टाकण्यासाठी शेतकऱ्यांना चालण्यासाठी धुरे हा एक मात्र मार्ग असतो. या धुर्‍यावर चालल्यास धुरा दाबला जाऊन पाणी भरताना वाफे फुटतात. त्याचा फायदा कांद्याच्या शेतीला होतो. या यंत्राला असलेल्या खाचे रोलरमुळे मोठे मातीचे ढेकळ फुटतात. लागवडीसाठी योग्य अंतरावर खाचे पाडून रोप लावण्यासाठी तयार खाचे पडतात. त्यामुळे हाताने किंवा तत्सम अवजाराने जमीन कोरण्याची गरज पडत नाही. हे आधुनिक खाचे यंत्र मजुरांच्या हात चलाखीला आळा घालून कांद्याची लागवड एकसमान पद्धतीने करण्यास मदत करते. त्यामुळे कांद्याच्या रोपांची संख्या वाढून उत्पन्न वाढते. हे यंत्र तयार करण्यासाठी गणेश चौधरी यांना केवळ 8 ते 10 हजार रुपये इतका खर्च आला आहे.

विशेष म्हणजे गणेश चौधरी यांनी यापूर्वी अनेक यंत्र तयार केले आहेत. त्यामुळे परिसरात त्यांची रॅंचो म्हणून ओळख निर्माण झाली आहे. गणेश चौधरी यांनी यापूर्वी खत लावणी यंत्र, हात कोळपे, बहुविध बेड मेकर यंत्र तयार केले आहे. त्यांचे बेड मेकर यंत्र टरबूज, गिलके ब्रोकोली, वालपापडी या पिकांच्या लागवडीसाठी उपयुक्त आहेत. शेतकऱ्यांचे श्रम कमी व्हावे या उद्देशाने तयार केलेले हे यंत्र सध्या शेतकऱ्यांमध्ये मोठा चर्चेचा विषय ठरले असून या यंत्रामुळे कांद्याची लागवड अत्यंत सोप्या पद्धतीने होणार असल्याने या यंत्राच्या पेटंट साठी आपण नोंदणी करणार असल्याची माहिती गणेश चौधरी यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version