November 22, 2024
व्हीडिओकॉनचे मालक वेणूगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक
महाराष्ट्र

व्हीडिओकॉनचे मालक वेणूगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक

आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणी कारवाई

लोकजागर ब्युरो

व्हीडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांना सीबीआयने अटक केली आहे. चंदा कोचर आणि दिपक कोचर यांच्या पाठोपाठ सीबीआयकडून आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणातील ही तिसरी अटक आहे.

आर्थिक नियमितता आणि कर्ज प्रकरणी घोटाळा झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि दीपक कोचर यांच्यानंतर वेणूगोपाल धूत यांना अटक करण्यात आली. सकाळी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानातून ही अटक झाली आहे.

सीबीआय कोठडीत असलेले चंदा कोचर आणि दीपक कोचर यांचा रिमांड आज संपणार आहे. त्यांना सीबीआय आज कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणात तिन्ही आरोपींना एकत्रपणे हजर करण्यात येण्याची शक्यता आहे.

आज कोर्टात होणाऱ्या सुनावणीत सीबीआयकडून चंदा कोचर आणि दिपक कोचर यांची सीबीआय कोठडी वाढवण्याची मागणी विशेष कोर्टात होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, वेणूगोपाल धूत यांचीही कोठडी मागण्यात येणार आहे. या तिन्ही आरोपींची एकत्रित चौकशी करायची आहे, असा मुद्दा सीबीआयकडून कोर्टासमोर मांडण्यात येण्याची शक्यता आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

2009 ते 2011 दरम्यान आयसीआयसीआय बँकेने व्हीडिओकॉन समूहाला सुमारे 1875 कोटींचे कर्ज दिले होते. मात्र या आर्थिक व्यवहारांमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप कोचर यांच्यावर करण्यात आला. याबाबत प्रारंभी बँकेने कोचर यांची बाजू घेतली होती. मात्र सीबीआयने तपास सुरू केल्यावर बँकेने भूमिका बदलली आणि जून 2018 मध्ये निवृत्त न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version