November 22, 2024
“…आणि तो जास्त बोलला तर उपमुख्यमंत्रीही राहणार नाही”- सुब्रह्मण्यम स्वामी
महाराष्ट्र

“…आणि तो जास्त बोलला तर उपमुख्यमंत्रीही राहणार नाही”- सुब्रह्मण्यम स्वामी

देवेंद्र फडणवीसांचा सुब्रह्मण्यम स्वामींकडून एकेरी उल्लेख

पंढरपूर: वाराणसी आणि तिरूपतीच्या धर्तीवर तीर्थक्षेत्र पंढरपूर कॉरिडॉर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २०३० कोटी ७० लाख रूपये खर्चाचा विकास आराखडा तयार केला आहे. मात्र हा कॉरिडॉर रद्द व्हावा या मागणीसाठी पंढरपुरात सर्वपक्षीय आंदोलन सुरू आहे. तीर्थक्षेत्र पंढरपूर कॉरिडॉर रद्द न झाल्यास स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या पदाधिका-यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे. तर काहीजण कॉरिडॉरच्या मुद्यावर पंढरपूर कर्नाटकला जोडण्याची आणि पुढच्या वर्षी आषाढी यात्रेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या महापूजेसाठी आमंत्रित करण्याची भाषा बोलत आहेत. असं असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र या कॉरिडॉरसंदर्भात ठाम असून काहीही झालं तरी हा कॉरिडॉर तयार होणारच असं सांगत आहेत. मात्र आता याच मुद्द्यावरुन थेट फडणवीसांची उपमुख्यमंत्रीपदाची खुर्चीही जाईल असा इशारा भाजपाचेच माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामींनी दिला आहे. विशेष म्हणजे स्वामींनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत हा इशारा दिला आहे.

तो जास्त बोलला तर उपमुख्यमंत्रीही राहणार नाही

देवेंद्र फडणवीस सांगत आहेत की पंढरपूरचं कॉरिडॉर होणारच. कोणीही मध्ये आलं तरी पंढरपूर कॉरिडॉर होणार असं ते म्हणत आहेत, असं सांगत पत्रकाराने स्वामींना फडणवीसांच्या भूमिकेवरुन प्रश्न विचारला. त्यावर स्वामींनी, “मी आव्हान देऊन सांगतो की नाही होणार आणि तो जास्त बोलला तर उपमुख्यमंत्रीही राहणार नाही,” असं म्हणत फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत मत मांडलं.

स्वामी यांनीही स्थानिक पदाधिकाऱ्यांप्रमाणे या कॉरिडॉरला विरोध करताना या कॉरिडॉरऐवजी पंढरपूरमधील इतर कामांना आणि कनेक्टीव्हीटीला प्राधान्य द्यावं असं स्वामींनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. आज स्वामींनी सोलापूर दौऱ्यावर असताना ही मुलाखत दिली.

कॉरिडॉर ऐवजी या कामांना द्या प्राधान्य

“कॉरिडॉरची काय घाई आहे कळत नाही. त्याऐवजी चंद्रभागा नदी स्वच्छ करा. इथं एखादं विमानतळ बांधा. या ठिकाणी किती लोकांना यायचं असतं, महाआरतीमध्ये सहभागी व्हायचं असतं. त्यांना धूळ मातीमध्ये यावं लागतं इथे. त्यामुळे आधी ते करा. विकासकामांमुळे सर्व काही छान होईल. नंतर कॉरिडॉरचं बघता येईल,” असं स्वामी म्हणाले.

भाजपाचे पदाधिकारीच म्हणतात पक्षाला किंमत मोजावी लागेल

या आंदोलनात सहभागी झालेले पंढरपूर शहर भाजपाचे अध्यक्ष विक्रम शिरसाट यांनी पंढरपूर कॉरिडॉर रद्द न झाल्यास पंढरपूर शहर व तालुक्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील असा इशारा दिला. पक्षाचे नेते, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर कॉरिडॉरला यापूर्वीच विरोध करून त्याबाबतची निवेदने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून दिली आहेत. तरीही विकास आराखडा लादला जाणार असेल तर त्याची किंमत सत्ताधारी म्हणून भाजपाला चुकवावी लागेल. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा शिरसाट यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version